ठळक मुद्दे
आठ हजार २२४ शेतकऱ्यांना फटका
जळगाव जिल्ह्यात पशुधन मृत्यूमुखी
इगतपुरी- त्र्यंबकेश्वरला संततधार सुरूच
Heavy rains in Nashik district damage crops on 4,350 hectares (10,000 acres) of land
नाशिक : राज्यात अतिवृष्टीने दहा हजार हेक्टरपेक्षा पीकांचे नुकसान झालेले असताना, नाशिक जिल्ह्यातही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात ४ हजार ३५ हेक्टर (१० हजार एकर) क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. मालेगाव तालुक्यातील १२ गावांमधील ८ हजार २२४ शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.
जिल्ह्यात गत 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परंतु गत आठवड्यापासून पावसाने जिल्हयात पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबई, कोकणासह राज्यभरात पावसाने हाहाकार उडविला असला तरी, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिकमधे पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र, १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने खरिप हंगामातील मका व कापूस या पिकांची हानी झाली आहे. विशेषत: मालेगाव तालुक्यातील कळवाडी भागातील १२ गावांना अतिवृष्टीचा तीव्र फटका बसला. शेतात उभा असलेले मका व कापूस पीक जमीनदोस्त झाले. बारा गावातील ८ हजार २२४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मक्याचे ८३४ हेक्टर तर कापसाचे ३२०१ हेक्टर इतक्या क्षेत्राचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे. दरम्यान, ऑगस्टमध्ये पावसाने सर्वत्र हजेरी लावल्यामुळे खरिप हंगामातील पिकांना काहीसा दिलासा मिळाला.
जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रावेर तालुक्यात भिंत पडून सात बकऱ्यांचा मृत्यू झाला. तर अनेक पाचोरा तालुक्यात अनेक घरांवरील पत्रे उडून गेले तसेच पडझड झाल्याने नुकसान झाले आहे. हतनूर धरणात पाण्याची पातळी वाढल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या शिवाय धुळे जिल्ह्यातही मका, कपाशीचे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात नद्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.
जिल्ह्यात विविध भागांत शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राथमिक आहवाल मागविण्यात आलेला आहे. मात्र, पाऊस सुरूच असल्याने अद्याप पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे पंचनामे तसेच आंतिक आकडेवारी आल्यानंतर नुकसानीचा आकडा वाढणार असल्याचे स्पष्ट आहे.