ठळक मुद्दे
अनेक घरांच्या भिंती कोसळल्या; नदीकाठच्या नागरिकांचे संसार उघड्यावर
शेतकऱ्यांची गुरे वाहून गेली; सणासुदीच्या तोंडावर अन्नधान्याची नासाडी
तब्बल चार लाख 46 हजार शेतकरी बाधित
नाशिक : प्रफुल्ल पवार
नाशिक विभागात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विभागातील पाच जिल्ह्यांतील सुमारे तीन लाख 29 हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे तब्बल चार लाख 46 हजार शेतकरी बाधित झाले असून, त्यात अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक हानी झाली आहे. सोयाबीन, मका आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने शासनाकडे सादर केला आहे. या अहवालानुसार नाशिक विभागातील अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या पाच जिल्ह्यांतील सुमारे ३ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पिकांचा चिखल झाल्याने शेतकऱ्यांचा हंगाम पुरता वाया गेला आहे.
अनेक गावे पाण्याखाली गेली असून, उत्तर महाराष्ट्रालाही या पावसाने झोडपून काढले आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये मागील दहा दिवसांमध्ये अतिवृष्टी झाली. काही तालुके व गावांमध्ये कमी कालावधीत जास्त पर्जन्याची नोंद झाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तब्बल चार लाख ४६ हजार २७६ शेतकरी बाधित झाले असून विभागामधील १ हजार ११ गावांमधील पिके मातीमोल झाली आहेत.
विभागात सर्वाधिक नुकसान अहिल्यानगर जिल्ह्यात नुकसान झाले. त्याखालोखाल जळगाव आणि नाशिक जिल्ह्याला फटका बसला आहे. महसूल विभागाने कृषीच्या सहाय्याने बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. मात्र, पावसाचा जोर कायम असून, शेतांमध्येही पाणी साचून राहिल्याने पंचनाम्यांना विलंब होत आहे. त्यामुळे पंचनाम्यांचा अंतिम अहवाल हाती आल्यानंतरच नुकसानीची तीव्रता समजणार आहे. बाधित क्षेत्र वाढण्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे.
विभागात मुख्यत: नुकसान झालेली पिके
सोयाबीन, संत्रा , पेरू, कांदा, बाजरी, भुईमूग, कापूस, तूर, मूग, उडीद, ऊस, केळी, लिंबू, बाजरी, सीताफळ, मका, काकडी यांसारख्या पिकांचा फटका बसला आहे.
मालेगाव, नांदगाव, सुरगाणा तालुक्यांना सर्वाधिक फटका
नाशिक जिल्हात सर्वाधिक नुकसान मालेगाव, नांदगाव, सुरगाणा या तालुक्यांमध्ये झाले आहे. तीन तालुक्यांमधील 65 गावांना या अतिवृष्टीचा फटका बसला, तर 20 हजार 222 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तब्बल 13 हजार 800 हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत.
पंचनामे करण्यासाठी जिल्हास्तरीय यंत्रणांना आदेश देण्यात आले आहे. सर्वेक्षण प्रगति पथावर असून, ४५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. ३३ टक्क्यांपेक्षा ज्यास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची माहिती शासन स्तरावर पाठवण्यात येईल.जितेंद्र वाघ, अप्पर आयुक्त