

येवला (नाशिक) : परतीच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटात शासन शेतकऱ्यांच्या बरोबर असून, सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. त्यांनी प्रशासनाला नुकसान पंचनामे मोहीम पातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले आणि त्यासाठी अतिवृष्टीग्रस्त नसलेल्या भागातील अधिकाऱ्यांची मदत घेण्याची सूचना केली.
परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या येवला तालुक्यातील गवंडगाव, रस्ते सुरेगाव, पिंपळखुटे खुर्द, डोंगरगाव आणि निफाड तालुक्यातील कोटमगाव व वनसगाव या गावांना गुरुवारी (दि. २५) भेट देऊन भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. हे मन हेलावणारे दृश्य पाहून मंत्री भुजबळ यांनी 'बळीराजाने धीर धरावा, खचून जाऊ नये', असे आवाहन केले.
परतीच्या ढगफुटीसदृश पावसामुळे मका, सोयाबीन, कांदा, द्राक्षबागा, भुईमूग, टोमॅटो आणि भाजीपाला यांसह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यापासून राज्य शासन मागे हटणार नाही, एकही बाधित मदतीपासून वंचित राहता कामा नये, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची घोषणा केली आहे. राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाद्वारे प्राथमिक मदत सुरू केली असून, प्रत्येकी १० किलो तांदूळ आणि १० किलो गहू वाटप केले जात आहे. आवश्यक ठिकाणी आरोग्य विभागाकडून वैद्यकीय सेवादेखील पुरविली जात आहे. मंत्री भुजबळ यांनी, रोगराई टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्य दक्षता घेण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडी, येवला तहसीलदार पंकज नेवसे, कृषी अधिकारी शुभम बेरड, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, नम्रता जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार आदी उपस्थित होते.