नाशिक : इंडियन प्रीमियर लीगसह स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करीत असलेल्या सौराष्ट्र संघाचा कर्णधार तथा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि महाराष्ट्र रणजी संघाचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉ यांना भारतीय संघात परतण्याचे वेध लागले आहेत. कामगिरीतील सातत्याबद्दल या दोघांनीही समाधान व्यक्त करताना, निवड समितीकडून अपेक्षा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शनिवार (दि. १)पासून खेळविल्या जाणाऱ्या रणजी स्पर्धेतील साखळी सामन्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. २) आयोजित पत्रकार परिषदेत दोन्ही खेळाडूंनी भारतीय संघात परतण्याबाबत आशावाद व्यक्त केला. जयदेव उनाडकट म्हणाला की, मागील काही दिवसांत अनेक वरिष्ठ खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे भारतीय संघात परतण्याबाबत अपेक्षा आहेत. मागील सिझन चांगला गेला आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढला असून, भारतीय संघात पुनरागमनाची अपेक्षा आहे, तर पृथ्वी शॉ याने निवड समितीवर याबाबतचा निर्णय सोपविताना सांगितले की, मागील काही काळापासून सातत्याने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मी वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघासाठी उत्कृष्ट खेळण्याचा प्रयत्न करत असतो. मी माझ्या वैयक्तिक कामगिरीचा कधीही लेखाजोखा ठेवत नाही. याचा विचार निवड समितीने करायचा असतो. मला विश्वास आहे की, निवड समिती याबाबत नक्कीच सकारात्मक विचार करेल.
निवड समितीचे लक्ष
रणजी सामन्यावर निवड समितीचे लक्ष असणार आहे. यासाठी बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. या सामन्यावर विशेषत: जयदेव उनाडकट, पृथ्वी शॉ यांच्यासह चेतन सकारिया, एच. देसाई, चिराग जानी, प्रेरक मांकड, अंश गोसाई, अर्शिन कुलकर्णी, सिद्धेश वीर, अंकित बावणे, जलज सक्सेना, विकी ओस्तवाल, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी या आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीवरही विशेष लक्ष असणार आहे.