नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शेंदूर्णी (ता. जामनेर) येथील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, सहसचिव दीपक गरुड आणि जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोनेकर यांच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि. २८) जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळले. तसेच या घोटाळ्यातील आणखी एक संशयित आरोपी अमोल कुलकर्णीची पोलिस कोठडीतून रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासादरम्यान नाशिक शहर गुन्हे शाखेने संजय गरुड याला २७ जुलैच्या रात्री सोलापूर जिल्ह्यातून अटक केली होती. त्यानंतर त्याचा भाऊ आणि संबंधित शिक्षण संस्थेचे सहसचिव दीपक गरुड यालाही अटक करण्यात आली. या प्रकरणात गरुड बंधूसह माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोनेकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती.
सरकार पक्षाचे सहायक अभियोक्ता तसेच संशयितांच्या वतीने वकील उपस्थित होते. मात्र, सुनावणी होऊ शकली नव्हती. बुधवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा सत्र न्यायालयाने तिघांचे जामीन अर्ज फेटाळले.
दरम्यान, याच घोटाळ्याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या अमोल कुलकर्णी याला सोमवारी (दि. २६) नाशिकरोड येथील अतिरिक्त न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली होती. कुलकर्णी हा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील एम. एफ. तराळ विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे.
संबंधित संस्थेचा सचिव विनोद रामदास तराळ याच्यासाठी शालार्थ आयडी मिळवून देण्याकरिता तो मध्यस्थ म्हणून काम करीत असल्याचा संशय आहे. विनोद तराळ याचाही अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला असून, तो सध्या पसार आहे.