लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार Pudhari File Photo
नाशिक

Sexual Harassment Case | नाशिकमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सरकारी तोरा! महिला सहकाऱ्याच्या छळप्रकरणी भद्रकाली अन् सातपूरमध्ये गुन्हे दाखल

Sexual Harassment Case | विशाखा समितीने हात वर केल्यामुळे पीडिता पोलिस ठाण्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शासकीय कार्यालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम, मात्र वागणूक थेट 'सरकारी साहेबां'सारखी! वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या कथित जवळकीचा आधार घेत महिला सहकाऱ्यांवर दबाव, पाठलाग, अश्लील फोन आणि विनयभंगापर्यंत मजल गेल्याचे दोन गंभीर प्रकार नाशिकमध्ये समोर आले आहेत. विशेष म्हणजे, एकाच महिला कंत्राटी कामगाराने वेगवेगळ्या टप्प्यांवर केलेल्या तक्रारींनंतर भद्रकाली आणि सातपूर पोलिस ठाण्यांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.

या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले, ते विशाखा समितीच्या भूमिकेमुळे. पीडितेने सुरुवातीला जिल्हा परिषद कार्यालयातील विशाखा समितीकडे धाव घेतली होती. मात्र, संशयिताचे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेशी थेट नाते नसल्याचे कारण देत, समितीने त्याच्यावरील कारवाईपासून हात झटकले, तर दुसऱ्या संशयिताला 'समजावून सांगतो' अशी भूमिका घेतल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

त्यामुळे अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणेकडून अपेक्षित दिलासा न मिळाल्याने अखेर पोलिसांत धाव घ्यावी लागल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणात कंत्राटी पद्धतीने शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अधिकारांच्या मर्यादांचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. डेटा एंट्री ऑपरेटर, वाहनचालक, एमआयएस समन्वयक अशा पदांवर कार्यरत असलेले काही कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या कथित संबंधांचा प्रभाव वापरून सहकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्हानुसार, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये काम करत असताना संशयित योगेश गोळे याने ३३ वर्षीय महिला सहकाऱ्याचा मोबाइल क्रमांक मिळवून तिला अनधिकृत संदेश पाठवले होते.

कार्यालयात तिच्या मागावर राहणे तसेच अनैतिक स्पर्श करून विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकाराची तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, 'तो मॅडमचा ड्रायव्हर आहे. तक्रार केली, तर तुलाच नोकरीवरून काढले जाईल,' अशी भीती दाखवून गप्प बसवण्याचा प्रयत्न झाल्याचेही तिने फिर्यादीत म्हटले आहे. तर, सातपूर पोलिस ठाण्यात दाखल दुसऱ्या गुन्ह्यात सनी धात्रक असे संशयिताचे नाव आहे.

पीडितेच्या आरोपानुसार, संशयिताने रात्री - अपरात्री फोन करून अश्लील मागण्या करण्यास सुरुवात केली. त्यानंतर धमक्याही दिल्या. २८ जुलैच्या रात्री तो थेट पीडितेच्या घरी पोहोचला. तिथे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ आणि लज्जास्पद वर्तन केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

विशाखा समितीकडे तक्रार

पीडितेने ७ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालयातील विशाखा समितीकडे दोन्ही संशयितांविरोधात लेखी तक्रार दिली होती. समितीच्या अध्यक्षांनी पीडितेच्या घरी जाऊन प्राथमिक चौकशी केल्याचे तिने नमूद केले आहे. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सनी धात्रक हा जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर कार्यरत नसल्याने त्याच्यावर समिती कारवाई करू शकत नसल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT