महिला मेळावा, खासदार सुप्रिया सुळे
नाशिक : मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करताना खा. सुप्रिया सुळे. समवेत खा. भास्कर भगरे, तिल्लोत्तमा पाटील, संगिता पाटील, अनिता दामले, कोंडाजी आव्हाड, गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, नितीन भोसले. (छाया: हेमंत घोरपडे)
नाशिक

Supriya Sule | राज्यात अशांतता पसरविण्याचे षडयंत्र

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांकडून भडक भाषणे केली जात असून राज्यात अशांतता पसरविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. राज्यात अदृश शक्ती कार्यरत आहेत. या शक्ती नाशिक व धुळ्यासारख्या दंगली घडवून अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळत जेलमध्ये जाणार होते म्हणून सत्तेत गेले. भाजपने आपला पक्ष भ्रष्टाचारमुक्त केला, असा टोला खासदार सुळे (Supriya Sule) यांनी यावेळी लगावला.

महिला मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या

  • मुलींना मोफत शिक्षण देण्याचा शब्द पाळला नाही

  • लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की लगेच काढून घ्या

  • बँका यांनीच चालवाव्या अन् बुडवाव्यात

  • जिल्हा बँकेची पारदर्शक चौकशी करताना सर्वांवर समान कारवाई करा

  • आम्ही प्रामाणिक म्हणूनच निवडून आलाे

  • सर्व यंत्रणा, सत्ता त्यांच्याकडे असताना जनता 'मविआ'सोबत

  • पंधराशे रूपयांऐवजी महागाई कमी करा

  • सरकारचे कामच नसल्याने लाडकी बहीण योजना

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सोमवारी (दि. १९) आयोजित महिला मेळाव्याप्रसंगी त्या बोलत होत्या. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पार पडलेल्या मेळाव्याला पक्षाचे नाशिक प्रभारी तिल्लोत्तमा पाटील, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, माजी आमदार नितीन भोसले, महिला जिल्हाध्यक्ष संगिता पाटील, शहराध्यक्ष अनिता दामले, नाना महाले, मुन्नाभाई अन्सारी आदी उपस्थित होते.

खा. सुळे पुढे म्हणाल्या, राज्यात अदृश शक्ती कार्यरत असून त्यांनी आपला पक्ष फोडला, चिन्ह पळविले. आपल्यातील काहींनी विकासाच्या नावावर विरोधकांशी हातमिळवणी केली. पण, ईडी, सीबीआय आणि जेलची भिती वाटत असल्याने ते आपल्याला सोडून गेले, असा टोला सुळे यांनी उपमुख्यमंत्री पवार व मंत्री छगन भुजबळ यांचा नामोल्लेख टाळत केला. पण आम्ही प्रामाणिक व स्वाभिमानी मराठी आहोत. आपली लढाई वैचारिक असल्याचे सांगताना बहिणीकडे प्रेमाने मागितले असते तर पक्षच काय सर्व दिले असते, अशा शब्दात सुळे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष करताना, पैश्याने सर्वकाही विकत घेता येत नाही. बँकेत पैसे आल्यास ते तातडीने काढून घ्या. कारण अर्ध्या बँका बुडाल्या असल्याचा आरोप सुळे यांनी केला. तसेच राज्यात आपले सरकार आल्यानंतर ही योजना अधिक बळकट करण्याची ग्वाही त्यांनी दिली. विधानसभा निवडणुकांसाठी ६५ दिवसांचा कालावधी बाकी आहे. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणार आहे. राज्यात सरकार आल्यानंतर सर्वप्रथम शेती व त्यासोबत निगडीत वस्तूंवरील जीएसटी हटविण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी निवडणुकीसाठी तन-मनाने कामाला लागावे, असा सल्ला ही त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांना दिला.

खा. भास्कर भगरे यांनी लोकसभा निवडणुकीत ड्युप्लिकेट तुतारीमुळे मला एक लाख तीन हजार मतांचा फटका बसल्याची खंत व्यक्त केली. पण, विधानसभेत ही चूक सुधारायची असून त्यासाठी घराघरापर्यंत पक्षचिन्ह पोहचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

दहा जागा लढवाव्या

जिल्हाध्यक्ष आव्हाड यांनी नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी किमान १० जागा मिळाव्यात, अशी मागणी केली. त्यामध्ये विद्यमान सहा जागांसह नाशिक मध्य आणि पश्चिम तसेच चांदवड - देवळा व बागलाण मतदारसंघ पक्षासाठी मिळावा, अशी जोरदार मागणी झाली.

SCROLL FOR NEXT