

नाशिक : विधानसभा निवडणुकीत आम्हाला मतदान न केल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू, अशा धमक्या सत्ताधारी पक्षाचे नेते देत आहेत. पण पैसे वाटप करून निवडणुका जिंकता येत नाही, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला. निवडणुका पुढे ढकलल्या असल्या, तरी तुम्ही निकाल कसा बदलणार? असा सवाल करत लाडक्या बहिणींशिवाय या सरकारला पास होणे कठीण आहे, असा टोलाही सुळे यांनी महायुतीला लगावला.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या खासदार सुळे यांनी सोमवारी (दि. १९) पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, लाडक्या बहिणीच्या योजनेवर सरकार २०० कोटी रुपयांच्या जाहिराती करते आहे. मात्र, हेच पैसे राज्यातील आशा वर्कर्सना आणि अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना दिले असते, तर त्यांची दिवाळी गोड झाली असती. सरकार आले नाही, तर लाडकी बहीण योजना बंद होईल. उठसूठ अशा धमक्या दिल्या जात आहेत. पण, यांचे सरकार येणारही नाही. अन् योजना बंदही पडणार नाही. आम्ही त्यात सुधारणा आणू अशी ग्वाही सुळे यांनी दिली. लोकसभा निकालानंतर लाडकी बहीण योजना आणली. लोकसभेच्या आधी बहीण लाडकी नव्हती का? असा खोचक टोला सुळे यांनी लगावला. नार-पार योजनेवर प्रतिक्रिया देताना नोकऱ्या घालविल्या तसे राज्याच्या हक्काचे पाणी वाया घालवू नका, असा उपरोधिक टोला सुळे यांनी राज्य सरकारला लगावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुकीच्या घटना कुठे घडत आहेत, हे माहिती नाही. नागपूरला पोलिस ठाण्यामध्येच जुगार खेळला जात असताना त्याकडे फडणवीस यांचे लक्ष नाही. त्यामुळे दुसऱ्यांना नावे ठेवण्याआधी चुकीच्या घटनांकडे लक्ष द्यावे असा सल्ला सुळे यांनी दिला. फडणवीस यांच्याशी मी कुठेही संवाद साधायला तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रकार हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एका गोष्टीचे वाईट वाटते की, प्रत्येकाचा मानसन्मान ठेवला पाहिजे. काळे झेंडे दाखवल्याचे पाहून वाईट वाटले. पण, दुसऱ्यांच्या घरात आपण कशाला पडायचे, अशी टीकादेखील सुळे यांनी केली.