नाशिक : दिलीप सूर्यवंशी
वाढत्या मानवी वस्त्यांमुळे दिवसेंदिवस जंगलक्षेत्र कमी होत असल्याने भक्ष्य आणि पाण्याच्या शोधार्थ बिबट्याने आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला आहे. त्यातूनच वारंवार बिबट्या आणि मानवी संघर्ष उफळून येत असल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात बिबट्यांनी गुरेढोरे, पाळीव पशू अन माणसांवर केलेल्या हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. एक बिबट्या आणि त्यामागे हजार माणसांचा जत्था त्यामुळे भांबावलेल्या जंगली बिबट्या हा प्राणी यामध्ये हिंस्त्र कोण ? असा प्रश्न बिबट्या आणि मानवी संघर्षामुळे उपस्थित होत आहे.
नाशिक पूर्व वनक्षेत्रात चांदवड, देवळा, दिंडोरी, कळवण, कनाशी, मालेगाव, नांदगाव, सटाणा, सुरगाणा, ताहाराबाद, उंबरठाण अन येवला आदी 12 वनक्षेत्रे येतात. दि. 5 मार्च 2024 रोजी मालेगाव शहरातील नामपूर रोडवरील लॉन्समध्ये बिबट्या शिरला होता. त्यावेळी मोहित विजय आहिरे या लहान मुलाने प्रसंगावधान दाखवून बिबट्याला लॉन्समध्ये खोलीत जेरबंद केले, तर दुसरीकडे दगड, तारा बांधून विहिरीत फेकून दिलेल्या अवस्थेत मृत बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली. दिंडोरी, कळवण, देवळा अन ताहाराबाद येथे पाच जणांवर बिबट्याने हल्ला केला. त्यात दिंडोरीतील वनारवाडी येथे राहणार्या विठ्ठल भिवा पोतदार (16) या मुलाचा मृत्यू झाला.
पश्चिम वनक्षेत्रात नाशिक, सिन्नर, इगतपुरी, बा-हे आणि ननाशी या ठिकाणी वर्षभरात बिबट्याच्या हल्ल्यात एकूण पाच जणांचा मृत्यू, तर सात जण जखमी झाले आहेत. इगतपुरी, नाशिक, पेठ, सिन्नर, त्र्यंबक, हरसूल, बा-हे आदी ठिकाणी 756 शेळ्यांचा मृत्यू झाला. सन 2024 मध्ये नाशिक पश्चिम वनपरिक्षेत्रातील सिन्नरमध्ये एक, इगतपुरीमध्ये दोन, तर सुरगाण्यातील बा-हे अन दिंडोरीतील ननाशीमध्ये प्रत्येकी एक जणावर बिबट्याने हल्ला केला, तर नाशिक येथे एक, सिन्नर येथे दोन, इगतपुरीत तीन, तर बा-हे येथे एक जण जखमी झाला.
नाशिक शहरातही बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. मागील दोन दिवसांपूर्वीच नाशिक रोड परिसरातील हांडोरे मळ्यात हृषिकेश छंद्रे या चारवर्षीय चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केला. यात चिमुरडा जखमी झाला, तर जाखोरी परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
20 टक्क्यांवरून 33 टक्के वनक्षेत्र वाढविण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. या अंतर्गत नाशिक विभागाच्या 220 चौरस किलोमीटर वनक्षेत्रात पावसाळ्यात तीन लाख वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट होते. मात्र ऑक्टोबर अखेरीस केवळ 40 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले. तीन लाख वृक्षलागवडीपैकी केवळ एक लाख 88 हजार 870 वृक्षलागवड करण्यात आली. उद्दिष्ट साध्य करण्यात नाशिक पश्चिम विभागाची उदासीनता दिसून आली.