

जिल्ह्यातील बिबट्यांची वाढती संख्या, त्याचे मानवी वस्तीवरील हल्ले हा चिंतेचा विषय ठरू पाहत आहे. आता ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. अधिवास सोडून भरदिवसा बिबट्या गाव, शहरांच्या वेशीवर पोहचला असून मानव-बिबट यांच्यातील संघर्ष वाढला आहे. जिल्ह्यात पाच वर्षात 14 हजार 442 हल्ले बिबट्यांनी केले आहेत. यात नागरिकांसह पशूधनाची हानी झालेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने बिबट्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर आढळून येता आहे. तसेच बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. मानव-बिबट यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी ठोस धोरणआखण्याची गरज आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी जिल्हा वनविभागाने नाशिक येथील विभागीय कार्यालयाला उपाययोजना संदर्भात प्रस्ताव पाठवलेला आहे. परंतु यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
नगर जिल्ह्यात मागील पाच वर्षात 14 हजार 442 हल्ले बिबट्यांनी केले. यामध्ये 20 नागरिकांचा मृत्यू तर 173 जण जखमी झाले आहेत.
तसेच 14 हजार 249 पशुधनाची हानी झालेली आहे. दुसरीकडे मागील दोन वर्षात विविध कारणांनी 76 बिबट्यांचे मृत्यू झाले आहेत. 2022 मध्ये 48 तर 2023 मध्ये 28 बिबट्यांचे मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाने दिली.
मानव-बिबट्या यांच्यातील संघर्ष फक्त एका जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. वनक्षेत्र घटल्याने आणि सिंचन सुविधा वाढल्याने, उसाचे क्षेत्र वाढल्याने बिबटे वनक्षेत्रातून उसामध्ये स्थिरावले आहेत. उसामध्ये हक्काचा निवारा, मुबलक पाणी आणि शेतकर्यांचे पाळीव पशुधन, भटकी-मोकाट कुत्री यामुळे बिबट्यांना खाद्य मिळत आहे. यामुळे बिबट्यांचा संचार मानवी वस्तीत आढळून येतो आहे.
2019-20 मध्ये 5 नागरिकांचा मृत्यू, 24 नागरिक जखमी, तर 1958 पशूधनाची हानी. 2020-21 मध्ये 3 नागरिकांचा मृत्यू, 33 जण जखमी, 2907 पशूधनाची हानी. 2021-22 मध्ये 5 नागरिकांचा मृत्यू 33 जणजखमी, 2230 पशूहानी. 2022-23 मध्ये 3 नागरिकांचा मृत्यू, 50 जण जखमी, 3773 पशूहानी आणि 2023-24 मध्ये 4 नागरिकांचा मृत्यू 33 जण जखमी आणि 3381 पशूधनाची हानी.