नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'डीजे'च्या आवाजावरून राज्यभरात चर्चा सुरू असतानाच नाशिकमध्ये या मुद्द्याला राजकीय रंग चढला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी 'नियमांच्या मर्यादेत डीजे वाजवा', अशी भूमिका मांडली असताना, त्यांच्याच भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी मात्र 'डीजे व लेझर शो नकोच', अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे एकाच पक्षातील या दोन भिन्न भूमिकांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गणेशोत्सव हा भक्ति, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. मात्र काही मंडळांकडून नागरिकांना त्रास होईल इतक्या मोठ्या आवाजात डीजे, गाणी तसेच डोळ्यांना धोका निर्माण करणारे लेझर शो आयोजित केले जातात. अशा प्रकारांना आळा घालण्याची गरज असल्याचे केदार यांनी स्पष्ट केले आहे. डीजे किंवा गाण्यांच्या आवाजाची मर्यादा निश्चित करणारे नियम असतानाही त्याचे उल्लंघन काही अतिउत्साही मंडळांकडून केले जाते.
मंडळाकडे अधिकाधिक गर्दी आकर्षित करण्यासाठी कानठळ्या बसतील आणि छातीत धडधड निर्माण होईल, इतक्या मोठ्या आवाजात संगीत वाजवले जाते. अशा प्रकारचा डीजे पूर्णपणे बंद करून पारंपरिक वाद्यांच्या साथीने गणेशोत्सव साजरा करावा, अशी भूमिका केदार यांनी मांडली आहे.
लेझर शोबाबतही त्यांनी आक्षेप घेतला असून, डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असलेल्या पद्धतीने लेझर किरणांचा वापर करणारे कार्यक्रम बंद झाले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच आवाजाची निश्चित केलेली डेसिबल मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर पोलिसांनी घटनास्थळीच कारवाई करून ध्वनिक्षेपण बंद करावे, अशी मागणीही केदार यांनी केली आहे.
केवळ नियम करून उपयोग नाही, तर त्यांची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांपासून नागरिकांनीही दूर राहावे, अशा मंडळांवर अघोषित बहिष्कार टाकून निषेध व जनजागृती करावी, असे आवाहनही केदार यांनी केले आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी, डीजेवर पूर्ण बंदीऐवजी नियमांच्या मर्यादेत डीजे वाजवण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी 'डीजे व लेझर शो नकोच' अशी भूमिका घेतल्यामुळे या दोन भूमिकांमधील फरक चर्चेचा विषय ठरत आहे.
महाजनांच्या भूमिकेनुसार मर्यादा पाळली जाते की नाही, हे प्रत्यक्षात कोण तपासणार आणि डेसिबलची मर्यादा कोणत्या पद्धतीने निश्चित केली जाणार, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. त्याच वेळी केदार यांनी थेट डीजेला विरोध केल्यामुळे त्यांच्या भूमिकेचे मात्र स्वागत होत आहे.
"गणेशोत्सवात डीजे आणि लेझर शोच्या माध्यमातून नागरिकांना त्रास होईल किंवा त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, असे प्रकार होता कामा नयेत. डीजेपेक्षा पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देऊन उत्सव साजरा करावा. आवाजाची ठरवून दिलेली मर्यादा ओलांडणाऱ्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी. गणेशोत्सव हा आनंदाचा आणि भक्तीचा उत्सव आहे, तो ध्वनिप्रदूषणाचा उत्सव होऊ नये."— सुनील केदार, शहराध्यक्ष, भाजप