Complete 35 percent of the work by the end of December: Minister Bhujbal
येवला : पुढारी वृत्तसेवा
लासलगाव-विंचूर रस्त्याच्या चौपदरीकरणासह काँक्रिटीकरण तत्काळ सुरू करावे, म्हसोबा माथा ते खेडलेझुंगे रस्त्याच्या कामाला गती द्यावी, मार्गावरील खड्डे तातडीने भरावेत, पिंपळस ते येवला रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे ३५ टक्क्यांपर्यंत काम डिसेंबरअखेर पूर्ण करावेत, असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
येवला येथील संपर्क कार्यालयात येवला व निफाड तालुक्यातील विविध कामांबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, मकरंद सोनवणे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, अल्केश कासलीवाल, बाळासाहेब गुंड, भगवान ठोंबरे, सुभाष गांगुर्डे आदी उपस्थित होते.
येवला व निफाड तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत व आवश्यक सेवा सुविधांची कामे जलद गतीने पूर्ण करावीत. नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करून कामे मार्गी लावण्यात यावी. शिरवाडे व देवगाव येथे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासनाला सादर करण्यात आले आहे. कोटमगाव येथे होणाऱ्या नवरात्र यात्रेच्या अनुषंगाने भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करावी. १३ ऑक्टोबरला मुक्तिभूमी येथे होणाऱ्या कार्यक्रमांसाठी रस्ते दुरुस्ती, वीज व पाणी यासह आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. या ठिकाणी स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी. मुक्तिभूमीच्या संरक्षक भिंतीचे काम १३ ऑक्टोबरच्या आत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी येवला व ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पिण्याच्या पाण्याची स्थिती, पालखेड डावा कालवा ओव्हरफ्लो रोटेशन, पुणेगाव-दरसवाडी आणि दरसवाडी - डोंगरगाव कालवा आवर्तन, शहर पिण्याच्या पाण्याची स्थिती, धुळगाव व १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कामाची स्थिती यांचाही आढावा घेतला. पालखेड तसेच पुणेगाव दरसवाडी पाण्याने सर्व बंधारे भरण्यात यावेत.
राजापूर व ४० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची राहिलेली व पाइपलाइनची कामे त्वरेने पूर्ण करावी, विंचूर लासलगावसह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची जुनी कामे तातडीने पूर्ण करून नवीन प्रशासकीय मान्यतेमधील कामे सुरू करावीत. स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे स्मारकाच्या कामास निधी उपलब्ध असून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावी. लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मंत्री भुजबळ यांनी दिले.