Cold wave continues in Nashik
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील पारा ११.८ अंश सेल्सियसवर गेला असला तरी, थंड वाऱ्यांमुळे नाशिककरांना दिवसभर हुडहुडीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे निफाडमध्ये पारा ८.५ अंश सेल्सियसवर असल्याने निफाडकरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.
उत्तरेकडून थंड वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने, आणखी दोन दिवस नाशिकमध्ये थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या प्रारंभी पारा १० अंशांच्या खाली घसरल्याने नाशिककरांना हाडे गोठविणाऱ्या थंडीचा सामना करावा लागला.
त्यानंतर मात्र, पारा वाढत गेल्याने, थंडी पुन्हा एकदा गायब होते की काय? अशी शंका व्यक्त केली जात असतानाच, थंड वारे वाहू लागल्याने, झोंबणाऱ्या थंडीचा अनुभव येत आहे. त्यातच कमाल तापमानातही मोठी घसरण होत असल्याने, दिवसभर थंडीचा सामना करावा लागत आहे. पुढील काही दिवस हे वातावरण कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दुसरीकडे निफाडमध्ये मात्र पारा आणखी घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.