

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकच्या तपोवनात साधुग्राम उभारणीसाठी 1,825 वृक्षतोडीचा वाद चिघळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह भाजपने वृक्षतोडीचे समर्थन करत वृक्षतोडीविरोधात आंदोलन करणाऱ्यांवरच आरोपांची राळ उडविली. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आपण साधू-संतांचा कुठलाही अपमान केला नसल्याचे स्पष्ट करत साधू-संतांना तरी झाड तोडलेले पटेल का? असा सवाल सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या वादात उडी घेत तपोवनातील जमीन बळकावण्यासाठी गिरीश महाजन यांनी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर, भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी तपोवनामधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा ते गप्प का असतात, असा सवाल करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
मनसे चित्रपट सेनेकडून आंदोलन
तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर राजकीय नेते, सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून याबाबत आवाज उठवत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडूनही तपोवनातल्या 1,800 झाडांची कत्तल प्रकरणी जाहीर निषेध करणार आहे. विशेष म्हणजे हा निषेध नोंदविण्यासाठी सर्व कलाकार सहभागी होणार असून, वृक्षप्रेमी-नाशिककर तुम्हीदेखील सहभागी व्हा, असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे. तपोवनातील कमानीजवळ छत्रपती संभाजीनगर रोड येथे शनिवारी 6 डिसेंबरला सकाळी हा निषेध नोंदविण्यात येणार आहे.
सदावर्तेंची सयाजी शिंदेंवर टीका
आरोप-प्रत्यारोपांच्या या गदारोळात ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील उडी घेतली आहे. वृक्षतोडीला विरोध करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, तपोवन हे साधूंसाठी आहे, त्यामुळे एक कलाकार म्हणून यामध्ये अडथळा निर्माण करणं हे योग्य नाही. असे आले किती आणि गेले किती, सयाजी शिंदे यांनी चिंतन करावं, त्यांनी केवळ स्क्रिप्ट वाचू नये, जास्त टर-टर करू नये, स्क्रिप्टवर जगणं सोडा, कुणाचं तरी ऐकून जगणं सोडा, असा घणाघात सदावर्ते यांनी केला आहे, तसेच त्यांनी यावेळी गिरीश महाज यांचंदेखील कौतुक केलं आहे.
काँग्रेसची नितेश राणेंवर टीका...
नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पलटवार केला आहे. लोंढे म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत आपण काय करतो आहे, काय करत नाही, पुढची पिढी आपल्यास काय म्हणेल? याचा विचार न करता मंत्रिपदावर बसून असे बेजबाबदार वक्तव्य करणे शोभते का? आपलं मंत्रिपद आणि आपले राजकारण टिकणे यासाठीच ते असे करतात. तपोवनमधील झाडे तोडण्याला कोणी समर्थन करत असेल तर त्याला पुढच्या पिढीची काळजी नाही, असे म्हणावे लागेल. यापूर्वी नाशिकमध्ये कुंभमेळा झाला नाही का? तेव्हा यांना झाड तोडण्याची गरज पडली नाही. मग आत्ताच का झाडे तोडण्याची वेळ आली आहे, असा सवाल अतुल लोंढे यांनी या वेळी उपस्थित केला.
जमीन बळकावण्याचे महाजनांचे षडयंत्र : दमानिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया या तपोवनात भेट देण्याची शक्यता आहे. दमानिया यांनी पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनाला पाठिंबा देत कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत वृक्षतोडीविरोधात भूमिका मांडली. साधुग्रामच्या नावाखाली जमीन बळकावण्याचे षडयंत्र सुरू आहे. महाजन हे असे षडयंत्र करत आहेत. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील समर्थन देत आहेत. नाशिकची जनता तपोवनातील झाडे वाचविण्यासाठी लढत आहेत. नाशिककर हे खपवून घेणार नाहीत. सगळीकडे झाडे तोडून जमिनी बिल्डर, राजकारण्यांच्या घशात घातल्या जात आहेत, असा आरोप दमानिया यांनी केला.
साधू-संतांना झाड तोडलेले पटेल का? : सयाजी शिंदे
वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून साधू-संतांचा अपमान केला नाही. मुळात साधू-संतांना तरी झाड तोडलेले पटेल का? असा प्रतिसवाल सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केला. ते म्हणाले की, दहा वर्षांच्या आतली झाडे तोडायची आणि त्या बदल्यात दुसरी झाडे लावायची कल्पना चुकीची आहे. म्हणजे, पोरांना मारायचे आणि आई-बापाला जिवंत ठेवायचे. झाडे हे आपले आई-बाप आहेत.आपल्या आई-बापांवर कोणी हल्ला करत असेल तर तुम्ही गप्प बसणार आहात का? मुळात झाडे तोडणे हे साधू संतांना पटेल का? असा सवाल उपस्थित केला. मंत्री नितेश राणे यांनी पर्यावरणवाद्यांवर केलेल्या वक्तव्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, मला त्याच्यावर उत्तर द्यायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यावरणवादी बकरी ईदला गप्प का? : आ. नितेश राणे
तपोवनातील वृक्षतोडीविरोधातील आंदोलन अधिक व्यापक बनले असताना भाजपचे नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तपोवनामधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा ते गप्प का असतात?, असा सवाल राणे यांनी केला. नितेश राणे यांनी ‘एक्स’पोस्ट करत टीकास्त्र डागले आहे. तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? अशी वादग्रस्त पोस्ट त्यांनी केली आहे. नितेश राणे यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.