आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी शक्य तेथे महायुती केली जाईल. जेथे तुल्यबळ परिस्थिती असेल तेथे मैत्रीपूर्ण लढती करू, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. pudhari news network
नाशिक

CM Fadnavis : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी शक्य तेथे महायुती

मुख्यमंत्री फडणवीस : मैत्रीपूर्ण लढतीचेही संकेत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी शक्य तेथे महायुती केली जाईल. जेथे तुल्यबळ परिस्थिती असेल तेथे मैत्रीपूर्ण लढती करू, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गत निवडणुकांमध्ये आम्हाला चांगले यश मिळाले होते. आगामी निवडणुकांमध्ये त्यापेक्षाही अधिक चांगले यश मिळेल, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक शुक्रवारी (दि. १०) पंचवटीतील स्वामी नारायण कन्व्हेक्शन सेंटर येथे पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या निमित्ताने विभागनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. त्या-त्या विभागांमधील जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, आणि महापालिकांसंदर्भात आढावा घेतला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी संघटनात्मक परिस्थिती, बुथ रचना, मागील निवडणुकांमधील परिस्थिती, युती कशी व कुठे होऊ शकते, अशा सर्व गोष्टींचा आढावा घेतला जात असून पुढील मार्गदर्शन केले जात आहे. आज आम्ही उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांचा आढावा घेतला. या निवडणुकांबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकुन घेतले. त्यांना पुढील दिशादर्शन देखील करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला चांगले यश मिळाले होते. यावेळी त्याहीपेक्षा अधिक चांगले यश मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे फडणवीस म्हणाले.

'गुंडमुक्त नाशिक'साठी पोलिस आयुक्तांना मोकळीक

नाशिक शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्तांना मोकळीक देण्यात आली आहे, असे नमूद करत गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी अतिशय चांगल्या पध्दतीने काम चालले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे कौतुक केले. गुन्हेगार भाजपचे असो वा अन्य कोणत्याही पक्षाचा कुणालाही सोडू नका, असे स्पष्ट आदेश पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. गुन्हेगारांना राजाश्रय देण्याचा प्रयत्नही मोडून काढण्यात येईल, असे नमूद करताना कुणाचा काहीही भूतकाळ असो पण आता जर कोणी गुन्हेगारी कारवाया करत असेल तर त्याला सोडले जाणार नाही, असा गर्भित इशारा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

घायवळला परवाना नाही

पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यासंदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी सुनावणी घेतली होती. परंतु हा परवाना घायवळला देण्यात आलेला नाही. पोलिस आयुक्तांनी तसे स्पष्ट केले आहे. परवाना दिला असता तर कदाचित विरोधकांनी केलेला आरोप योग्य आहे, असे म्हणता आले असते, असे नमूद करत घायवळ प्रकरणात उबाठाचे आमदार अनिल परब यांनी केलेले आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी फेटाळले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT