नाशिक : राजकारण्यांबरोबरच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची झोप उडवून देणाऱ्या नाशिकमधील हनी ट्रॅपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'फुलस्टॉप' दिला आहे.
सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित केल्याने, संपूर्ण राज्यात 'हनी ट्रॅप'ची विनाआधार चर्चा रंगली होती. त्यातच काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधिमंडळात थेट पेनड्राइव्ह दाखविल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. अशात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमध्ये 'ना हनी, ना ट्रॅप' असे म्हणत या प्रकरणाची हवा काढून घेतली आहे. तसेच पटोले यांचा पेनड्राइव्ह आपल्यापर्यंत आलाच नसल्याचे सांगत, त्यांचा पेनड्राइव्ह बॉम्बही निकामी केला आहे. महाराष्ट्र या आधीही अन् आजही सुसंस्कृत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने, या प्रकरणावर आता पडदा पडला आहे.
नाशिक आणि ठाणे केंद्रबिंदू असलेल्या 'हनी ट्रॅप'मध्ये राज्याच्या प्रशासनातील तब्बल ७२ वरिष्ठ अधिकारी आणि आजी-माजी मंत्री अडकल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे समोर येऊ लागल्याने, प्रकरणाची गंभीरता वाढली होती. नाशिकमधील हॉटेलमालक आणि ठाण्यातील ब्यूटीपार्लर व्यावसायिक महिला हनी ट्रॅपची मास्टरमाइंड असल्याचे बाेलले जात होती. तसेच काही अधिकाऱ्यांनी या प्रकरणी ठाण्यातील गुन्हे शाखा आणि नाशिकमधील मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केल्याचीही चर्चा होती. त्यामुळे अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित होणे क्रमप्राप्त होते. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी पेनड्राइव्ह दाखवित आपल्याकडे अधिकाऱ्यांची नावे असल्याचा दावा केला होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हनी ट्रॅप हा 'गुजरात पॅटर्न' असल्याचे खळबळजनक विधान केले होते.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, शुक्रवारी (दि. १८) विधिमंडळात अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना 'हनी ट्रॅप' नसल्याचे स्पष्ट करीत प्रकरणाला पूर्णविराम दिला. मुख्यमंत्री म्हणाले, 'अनेक दिवस सभागृहात हनी ट्रॅपची चर्चा होत आहे. कोणता हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही. नानाभाऊंनी तर कुठला बॉम्बच आणला म्हणे. पण, नानाभाऊ आमच्याकडे कोणताही बॉम्ब आलाच नाही. जर तुमच्याकडे असेल तर आम्हाला दिला तरी पाहिजे ना?, ना हनी आहे ना ट्रॅप आहे. नानाभाऊ कोणतीही घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे. पण वातावरण असे निर्माण होत आहे की, आजी- माजी मंत्री सगळे एकमेकांकडे बघत बसले आहेत. कोण या हनी ट्रॅपमध्ये फसले आहे? असाच एकमेकांना प्रश्न विचारत आहेत. कोणत्याही आजी-माजी मंत्र्यांच्या हनी ट्रॅपची तक्रारही नाही पुरावेही नाही. अशी कोणतीही घटना समोर आलेली नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही विरोधकांमध्ये हनी ट्रॅपची कुजबुज सुरू आहे. मात्र, जोपर्यंत याबाबत ठोस पुरावे समोर येत नाही, तोपर्यंत हनी ट्रॅप प्रकरण आता गुंडाळले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नाशिकच्या संदर्भात एकच तक्रार आली होती. एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात ती एक तक्रार होती आणि ती मागेही घेतली आहे.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मंत्री म्हणाले, विरोधकांनी आरोप केले - हनी ट्रॅप प्रकरणात राज्यातील सरकारी अधिकारी, आजी- माजी मंत्री अडकले असतील तर त्याची सरकार चौकशी करेल.चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
माझ्याकडे यासंदर्भात पेनड्राइव्ह आहे. सरकारचे मत असेल तर तो आम्ही दाखवू शकतो.नाना पटोले, आमदार, काँग्रेस
ज्याने हनी ट्रॅप घडवून आणला तो सर्वांचाच मित्र आहे. अगोदर त्याचे हॉटेल होते, आता त्याचे रिसॉर्ट आहे. या ठिकाणी त्याने आठ कोटींचे कॅमेरे लावले आहेत. हा गुजरात पॅटर्न आहे.जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी शरद पवार गट