राज्याच्या मुख्यमंत्रिपदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर प्रथमच नाशिक दौऱ्यावर देवेंद्र फडणवीस आले आहेत.  Pudhari News Network
नाशिक

CM Fadnavis | मुख्यमंत्र्यांकडून आज सिंहस्थ निधीची घोषणा?

नियोजन बैठक; त्र्यंबकेश्वर, साधुग्रामची करणार पाहणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : राज्याच्या मुख्यमंत्रिपदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर प्रथमच नाशिक दौऱ्यावर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. 23) सिंहस्थ कुंभमेळा नियोजन बैठक होत असून, यात सिंहस्थ निधीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सिंहस्थ आढावा बैठकीसाठी महापालिकेसह जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. सिंहस्थ तयारीचा आढावा घेताना फडणवीसांकडून त्र्यंबकेश्वर व नाशिक येथील प्रस्तावित सिंहस्थ कामांची स्थळ पाहणीही केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या नेतृत्वाखाली सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन सुरू असून, महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम, पोलिस विभाग, जिल्हा परिषद, जलसंपदा, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह विविध विभागांचा 15 हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा तयार करण्यात आला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी महाकुंभसंदर्भात मुंबईमध्ये बोलाविलेल्या या बैठकीत या आराखड्याची माहिती घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन वेळा मुंबईत बैठक घेऊन सिंहस्थ कामांसंदर्भात तयारीच्या सूचना दिल्या. त्यानंतर फडणवीस हे शनिवारी (दि. 22) नाशिकमध्ये येऊन रविवारी सिंहस्थाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मधील सिंहस्थासंदर्भात यापूर्वी दिलेल्या आदेशांची काय अंमलबजावणी झाली यासह गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी काढलेली निविदा, साधुग्राम आणि तपोवनातील तयारीचा आढावा फडणवीस घेणार आहेत. सिंहस्थ आढाव्याबरोबरच फडणवीस शहरातील विविध कार्यक्रमांनाही हजेरी लावणार आहेत.

या कामांचा घेणार आढावा

  • कुंभमेळा विकास आराखडा

  • साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा आरक्षित करणे

  • गोदावरी प्रदूषणमुक्त करणे

  • वाहतूक व सुरक्षा

  • मलनिस्सारण केंद्र अद्ययावतीकरण

  • भाविकांसाठी पाणीपुरवठा

  • कुंभमेळ्यातील स्वच्छता

त्र्यंबकेश्वरसह रामकुंड, साधुग्रामची पाहणी?

मुख्यमंत्री फडणवीस हे त्र्यंबकेश्वर येथे सकाळी सिंहस्थकामांची पाहणी करतील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत सिंहस्थ आढावा बैठक होणार आहे. या बैठकीनंतर फडणवीस हे रामकुंड, तपोवन, साधुग्राम आदी ठिकाणी पाहणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महापालिकेकडून प्रस्तावांचा पाऊस

या बैठकीच्या माध्यमातून १३७४ कोटींच्या मलनिस्सारण योजनेसह साधुग्रामसाठी एक हजार एकर क्षेत्राचे अधिग्रहण, विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतावाढीसह शाही मार्ग नूतनीकरण व रुंदीकरण तसेच सुमारे ३०० कोटींच्या रस्ते विकासाच्या निविदाप्रक्रियेला निधी मिळण्याच्या अटीवर परवानगी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना महापालिकेच्या वतीने साकडे घातले जाणार आहे.

नोकरभरतीवरही चर्चा होणार

महापालिकेतील रिक्त पदांची संख्या ३३०० वर गेली आहे. निम्म्यावर आलेल्या रिक्त पदांमुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात शिथिलता आली आहे. त्यामुळे रिक्त पदांच्या भरतीसाठी आस्थापना खर्चमर्यादा अट शिथिल करण्याची तसेच बिंदू नामावलीचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT