नाशिक : प्रयागराज कुंभमेळ्यात देशातील सांस्कृतिक पुर्नजागरणाच्या मोहिमेची प्रचिती आली. याच कुंभच्या परंपरेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा महत्वाचा मानला जातो. सिंहस्थ यशस्वीरित्या पार पडण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून २० हजार कोटींची कामे मंजूर करण्यात आली असून, कुंभमेळ्यापर्यंत ही कामे २५ हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असे नमूद करत या माध्यमातून नाशिक तीर्थक्षेत्र, पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्याची योजना असून दर्जेदार सिंहस्थ कामांतून आधुनिक नाशिकची निर्मिती केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आणि नाशिक महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने होणाऱ्या नाशिक शहरातील पाच हजार ६५७ कोटी ८९ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरूवारी(दि.१३) करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ठक्कर मैदान येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार राहुल ढिकले, राहुल आहेर, सीमा हिरे, देवयानी फरांदे, पंकज भुजबळ, तानाजी बनकर, राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार व नगर विकास विभागाचे अपर सचिव गोविंदराज (दूरदृष्यप्रणालीद्वारे), जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.प्रविण गेडाम,कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते. प्रयागराज येथे नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक आल्याचे नमूद करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यंदा नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यातही गतवेळेपेक्षा पाचपट अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांची व्यवस्था, सुरक्षा, पर्वस्नान व अमृतस्नानाचे नियोजन आणि या सोहळ्याचा मुळ गाभा असलेल्या आध्यात्मिकतेचा अनुभव भाविकांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने कामे केल्याने मोठ्या प्रमाणात कामाला सुरूवात होत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांनीही यासाठी सहकार्य केले आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कुंभमेळ्यासाठी रस्ते, महामार्ग दुरूस्ती, पिण्याच्या पाण्याची योजना, गोदावरीचे पावित्र्य राखणे, चांगल्या घाटांची निर्मिती, जुन्या मंदिरांचे पुनरुज्जीवन, विकासकामे करतांना गोदाघाटाचे पुरातन रुप कायम ठेवणे यावर भर देण्यात येत आहे. नाशिक हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने इथे होणारी विकासकामे पुढील २५ वर्ष टिकली पाहिजे आणि नाशिक पर्यटनक्षेत्र म्हणून विकसीत व्हावे असा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. या विकासकामांच्या माध्यमातून नाशिकचे रुप बदलेल आणि शहराच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुंभमेळ्यात भाविकांचे व्यवस्थापन व्हावे यासाठी बाह्य वर्तुळाकार मार्ग तयार होत असून भविष्यातल्या नाशिकसाठी याचा फायदा होणार आहे. नाशिक विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत, रेल्वे सुविधा, बस स्थानकाची सुविधा, स्मार्ट सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून आधुनिक नाशिक शहर विकसीत करण्यावर भर देण्यात येत आहे, असे नमूद करत कुंभमेळ्याची ही सर्व कामे पारदर्शी पद्धतीने होतील अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
साधुग्रामसाठी १२०० एकर जागेचे अधिग्रहण
सिंहस्थ कुंभमेळ्यात ७५ वर्षानंतर त्रिखंड योग जुळून आल्याने हे कुंभपर्व विशेष असून ते २८ महिने चालणार आहे. ४० ते ४२ पर्वस्नान आणि महत्वाचे अमृतस्नान या कुंभात होणार आहे. प्रयागराज येथे १५ हजार हेक्टर जागा असून नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे ५०० एकर जागा आहे. अत्यंत कमी जागा असूनही २०१५ मध्ये कुंभमेळ्याचे चांगले आयोजन करण्यात आले. यावेळीदेखील असे आयोजन व्हावे यादृष्टीने शासन आणि प्रशासनाने त्यासाठी आवश्यक तयारी सुरू केली आहे, असे नमूद करत साधुग्रामसाठी १२०० एकर जागेचे अधिग्रहण केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांकडून ढिकलेंचे कौतुक
सिंहस्थांतर्गत पंचवटीत उभारण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी राम काल पथ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी बजावलेल्या भूमिकेचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी भरसभेत कौतुक केले. विकासकामे करतांना नागरिकांचे नुकसान होऊ देणार नाही, तथापि सामाजिक कार्य समजून नागरिकांनीही विकासकामांना सहकार्य करावे. साधूसंतांनी शासनाला कुंभमेळा आयोजनासाठी मार्गदर्शन करावे, त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
टेंडरच्या भानगडीत पडू नका!
सिंहस्थ कामांच्या टेंडरविषयी गैरसमज निर्माण करणारी माहिती माध्यमांपर्यंत पोहोचविणाऱ्या नेतेमंडळींना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कानपिचक्या दिल्या. या कामांमधील योग्य-अयोग्य अधिकारी पाहतील. आम्ही त्यात कुठलाही हस्तक्षेप करत नाही, करणारही नाही. चांगल्या दर्जाची कामे होण्यासाठी चांगले मक्तेदार हवे असतात. सर्व कामे पारदर्शक पध्दतीने दर्जेदार होतील, अशी ग्वाही देत नेत्यांनी, पत्रकारांनी या भानगडीत पडू नये, असा गर्भित इशाराच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.