

नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात भाजप निवडणुकीचा बिगुल वाजविणार आहे. येत्या आठवडाभरात पहिल्या टप्प्यातील ६०४२ कोटी रूपयांच्या ५५ विविध विकास कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ केला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह डझनभर मंत्र्यांच्या उपस्थितीत ६०४२ कोटींच्या कामांचा शुभारंभ केला जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडून संबंधीत कामांची यादी तयार करण्यात आली असून, बहुतांश कामांच्या निविदा प्रक्रिया पार पडल्या आहेत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातील आठ ते दहा नोव्हेंबर या कालावधीत नगरपालिका, नगरपंचायती व जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या कामांना अडथळा नको म्हणून आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ५५ कामांचे भूमिपूजन व उदघाटन केले जाणार आहे.
यात राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका तसेच पुरातत्व विभागाच्या कामांसह त्र्यंबक नगरपालिकेच्या कामांचा समावेश आहे. याच भूमिपूजन व उदघाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपकडून निवडणुकीचा बिगूलही वाजविला जाणार आहे. या कामांमध्ये राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २२७० कोटींच्या १८ रस्ते कामांचा समावेश आहे. या रस्त्यांची एकूण लांबी ४४०.९७ किमी इतकी आहे. त्याचबरोबर नाशिक महापालिकेच्या शहरात होणाऱ्या रस्ते, पुल, एसटीपी, पाणी पुरवठा योजना, मलनिस्सारण, सीसीटिव्ही यासारख्या ३२ कामांचा समावेश असून, या कामांवर अंदाजीत खर्चही ३६८४.०५ कोटी इतकी आहे. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेअंतर्गत दोन कामांसाठी ७६.०६ कोटी तर पुरातत्व विभागाकडील चार कामांसाठी १६ कोटी ५४ लाख इतका खर्च येणार आहे.
मलनिस्सारण व्यवस्थेसाठी १४७५ कोटी
शहरातील मलनिस्सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी अस्तित्वातील एसटीपी प्रकल्पांचे अद्ययावतीकरण करणे तसेच सुधारणा करणे आणि दोन नवीन एसटीपी प्रकल्पांच्या कामांवर १४७५.५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. सीसीटिव्हीसाठी ३५४ कोटी तर ऑप्टीक केबल टाकण्यासाठी ७० कोटी खर्च होणार आहेत.
सिंहस्थ कामे व त्यावर होणारा खर्च (कोटीत)
मुकणे धरण पाणी पुरवठा विस्तारीकरण : ३७१.७५
अमृत योजनेअंतर्गत शहर पाणी पुरवठा : ३०५.१२
मलनिस्सारण व्यवस्था सुधारणा करणे : १४७५.५०
नाशिक स्मार्ट सिटी सीसीटिव्ही : ३५४
रामकाल पथ प्रकल्प विकसीत करणे : ८५
त्र्यंबकेश्वर वाढीव पाणी पुरवठा योजना : ६४.२१
सिंहस्थ कामांच्या बहुतांश निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. येत्या आठ दिवसांमध्ये या कामांना सुरूवात होईल. यामुळे सिंहस्थाची कामे दिसून येतील. कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असण्यास प्राधान्य असेल.
डॉ. प्रवीण गेडाम, अध्यक्ष, कुंभमेळा प्राधिकरण