नाशिक : नाशिकशी आमचे नाते कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहील. आम्ही केवळ ब्लू प्रिंट दाखविणारे नाहीत तर प्रत्यक्ष काम करणारी माणसं आहोत, अशा शब्दांत उद्धव व राज ठाकरेंवर हल्लाबोल करत आधुनिक नाशिक घडविण्याची आणि नाशिकला सांस्कृतिक व मॅन्युफॅक्चरिंग राजधानी बनविण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांना दिली.
नाशिकमध्ये गेल्या काही वर्षात ५७ हजार कोटींची गुंतवणूक आणली असून, ३० हजार कोटींची सिंहस्थ कामे सुरू आहेत. पुढील काळात आणखी ५० हजार कोटींची गुंतवणूक नाशिकमध्ये होणार असल्याचा दावा करत दत्तक नाशिक विधानावर टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, असा विश्वास व्यक्त करताना लाडक्या बहिणींना आता लखपती दीदी करायचे आहे, असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ गोदाघाटावर आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, आ. डॉ. राहुल आहेर, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, संघटनमंत्री रवि अनासपुरे आदींसह उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिकच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर आराखडा मांडत, आधुनिक पायाभूत सुविधा, उद्योग, सुरक्षितता आणि धार्मिक-सांस्कृतिक वारसा यांचा समन्वय साधत विकासकामांचा (उबाठा) लेखाजोखा मांडतानाच शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट शब्दांत टीका केली. २०१५ मध्ये नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना कुंभमेळा आला तेव्हा त्यांनी निधी देण्यास नकार दिला होता. त्यावेळी राज्यातील युती सरकारने सहा हजार कोटी दिले, सिंहस्थ निविघ्न पार पडला, असे नमूद कुंभमेळ्याची खिल्ली उडविणारे हे लोक आहेत, असे फडणवीस म्हणाले.
आगामी सिंहस्थासाठी नाशिकमध्ये ३० हजार कोटींची कामे सुरू असल्याचे सांगत नाशिकचा कायापालट करण्याची ताकद केवळ भाजपातच असल्याचा दावा त्यांनी केला. १२०० कोटींच्या गुंतवणुकीतून नाशिकचे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचे प्रयत्न असून उद्योग, पर्यटनवाढीसह आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. नाशिकसाठी १० हजार कोटी रुपयांचा रिंग रोड विकसित नाशिकच्या भविष्याची नांदी ठरेल. चार राष्ट्रीय महामार्ग, चार राज्य महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि नाशिक-चेन्नई महामार्गाशी जोडणारा हा रिंग रोड नाशिकला औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करेल, असा दावा त्यांनी केला.
शहरातील ६० प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून पुढील ५० वर्षे खड्डेमुक्त रस्ते देण्याचा निर्णय घेतल्याचे तसेच गंगापूर धरणाच्या ३५ वर्षे जुन्या पाईपलाईनऐवजी नवीन पाईपलाईनद्वारे २४ तास अधिक दाबाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोदावरी स्वच्छतेसाठी सुमारे २,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून, एसटीपी प्रकल्प नव्या कार्यपद्धतीने राबवले जात असल्याचे नमूद करत दर तीन महिन्यांनी पाण्याची गुणवत्ता तपासली जाईल आणि निकष पूर्ण झाल्यावरच कंत्राटदारांना पैसे दिले जातील, अशी अट घालण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फेस रेकग्निशन, नंबर प्लेट रेकग्निशन प्रणाली बसवण्यात आल्याचे सांगत, गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. फायबर ऑप्टिक नेटवर्कद्वारे नाशिकला स्मार्ट आणि सेफ सिटी बनवण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
५७ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा दावा
नाशिकमध्ये आतापर्यंत ५७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचा दावा करत, रिलायन्स, विमाननिर्मिती उद्योग, नवी एमआयडीसी, संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग नाशिकमध्ये येत असल्याचे त्यांनी सांगितले. दाओसमधील नवीन करार लक्षात घेता पुढील काळात आणखी ५० हजार कोटींची गुंतवणूक नाशिकमध्ये होणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना नाशिकला पुढील काळात औद्योगिक आणि लॉजिस्टिक हब बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नवीन उद्योगांसाठी एक हजार एकर जागेवर नवीन एमआयडीसी उभारण्याची घोषणा देखील त्यांनी केली.