नाशिक : कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल अशा भव्यदिव्य आणि स्मरणीय कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीत साधू- महंतांना दिली. याचबरोबर साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहणासह विविध विकासकामांसाठी सुमारे 4 हजार कोटींच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यातील अमृत स्नानाच्या तारखा जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (दि. 1) नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, आ. डॉ. राहुल आहेर, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, कुंभमेळ्याचे संचलन आखाडे, साधू- महंत करतात, राज्य शासन सेवक म्हणून अधिकाधिक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करते. शासनातर्फे उत्तम सुविधा उभारण्यात येतील. कुंभमेळ्याबाबत साधू- महंतांचा अनुभव मोठा आहे, त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. 2015 मध्ये तयारीसाठी कालावधी कमी होता. यावेळी पूर्वतयारीसाठी अधिक कालावधी असल्याने शासन चांगली तयारी करीत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान असलेल्या चौंडीच्या विकासासाठी 681 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यांनी तयार केलेल्या घाटांचे संवर्धन करण्यात येत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथेदेखील उत्तम सुविधा उभारण्यात येतील. त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. भाविक आणि साधू- महंतांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने नियोजन करताना सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी दिली. मागील सिंहस्थात ज्या शेतकर्यांकडून जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या, त्यांना मोबदलादेखील लवकरात लवकर देण्यात येईल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी विविध आखाड्याच्या साधू- महंतांनी कुंभमेळा आयोजनाबाबत सूचना केल्या. यावेळी रामानंद निर्मोही आखाडा, निर्मोही अनी आखाडा, श्री दिगंबर अनी आखाडा, निर्वाणी अनी आखाडा श्री पंचायती उदासीन आखाडा, श्री पंचायती नया उदासीन आखाडा, श्री पंचायती निर्मल आखाडा, श्री पंचायती अटल आखाडा, श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा, श्री पंच अग्नी आखाडा यांच्यासह विविध आखाड्यांचे पदाधिकारी, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, पुरोहित संघाचे त्र्यंबकेश्वर येथील अध्यक्ष मनोज थेटे आदी उपस्थित होते. प्रारंभी सर्व साधू, महंतांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्रोच्चारात स्वागत केले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व साधू- महंतांचे शासनातर्फे स्वागत केले.
2015 मध्ये तयारीसाठी सरकारला कालावधी कमी होता. यावेळी पूर्वतयारीसाठी अधिक कालावधी असल्याने शासन चांगली तयारी करीत आहे. चार हजार कोटींच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून, अजून 2 हजार 600 कोटींच्या निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ही सर्व कामे जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्यात येतील. त्र्यंबक येथील कुशावर्त येथे गर्दी होऊ नये, यासाठी योग्य नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.