नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेला अतिशय सुंदर आणि भव्य अशा नव्या इमारतीचा लाभली आहे. ही इमारत राज्यातील सर्वांत मोठ्या जिल्हा परिषद इमारतींपैकी एक आहे. तिचे डिझाईन उत्कृष्ट असून बांधकामही दर्जेदार झाले आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे गुरूवारी (दि. 13) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, मंत्री नरहरी झिरवाळ, राज्य विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे समिती प्रमुख आमदार सुहास कांदे, खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, डॉ. शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, दिलीप बनकर, नितीन पवार, किशोर दराडे, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, डॉ. राहुल आहेर, मंगेश चव्हाण, राहुल ढिकले, प्रा. देवयांनी फरांदे, पंकज भुजबळ मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, ग्रामविकासचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी ओमकार पवार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील जिल्हा परिषदांच्या इमारतीपैकी सर्वात सुंदर अशी ही इमारत झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी यांचे अभिनंदन केले पाहिजे. सुसज्ज सुविधांसह असलेली ही इमारत जनसामान्य व्यक्तींना सुविधा निर्माण करणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी जि.प. सीईओ ओमकार पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपस्थितीत मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी महेश पाटील, कंत्राटदार अभिजीत बनकर यांसह विभागप्रमुख उपस्थितीत होते.
यांची विशेष उपस्थिती
इमारतीच्या उदघाटनप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, विजयश्री चुंभळे, बाळासाहेब क्षीरसागर, मायावती पगारे, पंढरीनाथ थोरे, माजी सभापती मनीषा पवार, अलका जाधव, यतिंद्र पगार यांसह माजी सदस्य अमृता पवार, लता बच्छाव, नूतन आहेर, जे.डी, हिरे, यशवंत ढिकले, उदय जाधव, सुरेश कमानकर, प्रविण गायकवाड, बाळासाहेब माळी, अशोक टोंगारे, विनायक माळेकर, गोरख बोडके, विलास बच्छाव आदी उपस्थितीत होते.
मंत्रालय येथे शिफ्ट करता येईल
जिल्हा परिषदेला 'मिनी मंत्रालय' असेही संबोधले जाते. दोघी ठिकाणचा कारभार एकसारखा असल्याने कामकाजाची पध्दत एकसमान असते. हाच धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषदेची इमारत इतकी भव्य आहे की, काहीकाळासाठी मंत्रालय येथे शिफ्ट करता येईल, येथून मंत्रालयाचा कारभार चालविता येईल, असे सांगितले. परंतू, त्याची आवश्यकता भासणार नसल्याचे सांगत त्यांनी आधिच्या वाक्याला जोड दिल्याने, कार्यक्रमस्थळी स्मितहास्याचे फवारे उडाले.
'सीईओ'ना बसविले खुर्चीवर
नूतन इमारतीची पाहणी करताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांच्या दालनास भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सीईओ पवार यांना खुर्चित बसवले. त्यावेळी पवार यांना अवघडल्या सारखे झाले मात्र, दोघांनाही त्यांचा अवघडलेपणा दूर करत त्यांना खुर्चीवर बसवत फोटोसेशन केले. लोकशाहीत लोकप्रतिनिधी श्रेष्ठ ठरतात. पण प्रशासनात मुख्य कार्यकारी अधिकारी हे 'मिनी मंत्रालया'चे प्रमुख असल्याने त्यांना खुर्चित बसवून जणू प्रशासनच येथील मुख्य कारभारी असल्याचे दाखविले.
अहोरात्र राबली यंत्रणा
नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनासाठी जिल्हा परिषदेची प्रशासकीय यंत्रणा तीन दिवसांपासून अहोरात्र राबत होती. गत आठ दिवसांपासून तर, मुख्यकार्यकारी अधिकारी पवार हे हेडमास्तरप्रमाणे पाठपुरावा करत, यंत्रणेकडून कामे करून घेत होते. तर, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे हे रात्रदिवस तेथे ठाण मांडून होते. अधिकारी अन कर्मचारी यांच्याकडून ते सर्व कामे करून घेत होते. याशिवाय इतर, विभागप्रमुखांवर जबाबदारी सोपविली होती त्याप्रमाणे कामे करत होती. उदघाटन सोहळा निर्विघ्न पार पडल्यानंतर सर्व यंत्रणेने निश्वास सोडला.
आमदार उपस्थित, खासदारांना आमंत्रण नाही
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत रामकुंड परिसरात पार पडलेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनावेळी ग्रामीण भागातीलही आमदार व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. माजी खासदार हेमंत गोडसे यांची देखील उपस्थिती होती. मात्र, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे कार्यक्रमात दिसले नाही. समाज माध्यमात त्यांच्या नावाचा उल्लेख होता. मात्र, याबाबत वाजे यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांना आमंत्रण नसल्याने ते कार्यक्रमाला उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले.
'उद्योजिकांच्या यशोगाथा' मासिकांचे प्रकाशन
उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या रुटस ऑफ चेंज नाशिकच्या ग्रामीण महिला 'उद्योजिकांच्या यशोगाथा' या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.