Citylink ticket money in conductor's pocket
नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकडे सिटीलिंकचा तोटा कमी व्हायचे नाव घेत नसताना प्रवाशांकडून मिळणाऱ्या तिकिटाच्या पैशांवर काही वाहक डल्ला मारत असल्याचा गंभीर प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आला आहे. बसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम प्रशासनाने हाती घेतले असून, दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
शहरातील प्रवाशांना अधिकाधिक चांगली सुविधा मिळावी या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या माध्यमातून शहर बससेवा सुरू केली. २०२१ पासून ही बससेवा सुरू झाली. अल्पावधीत सिटीलिंक बससेवा प्रवाशांच्या पसंतीला उतरली. आजमितीस दररोजची प्रवासी संख्या ७० हजारांपर्यंत पोहोचली आहे. सिटीलिंकमुळे महापालिकेला दरमहा सुमारे सहा कोटी अर्थात वर्षाला सुमारे ७२ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी सिटीलिंक व मनपा या संयुक्त विद्यमाने अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असल्या तरी तोटा कमी करण्यात अद्याप व्यवस्थापनाला यश येऊ शकलेले नाही.
महापालिकेकडे जवळपास ४० तिकीट तपासणीस आहेत. या तपासणींमार्फत विना तिकीट प्रवासी व वाहकाकडून प्रवाशांना तिकीट दिले जाते की नाही याची तपासणी केली जाते. या तपासणीत ११ वाहक प्रवाशांना तिकीट न देता पैसे खिशात टाकत असल्याची बाब आढळून आली असून, त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करत संबंधित ठेकेदारावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सिटीलिंकचे मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी यांनी दिली.
दिंडोरी मार्गावरील बसच्या एका वाहकाने तब्बल १६ प्रवाशांना तिकीट न देता तिकिटाचे पैसे खिशात घातल्याची बाब समोर आली आहे. तर अन्य एका घटनेत एका वाहकाने कोणत्या बसथांब्यावर किती पैसे मिळाले याचा हिशोब एका कागदावर लिहून ठेवल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे ही बाब पकडली गेली तेव्हा संबंधित वाहकाने तिकिटाचा रोल संपल्याचे कारण पुढे केले. मात्र, हे कारण पुरेसे ठरले नाही. यामुळे संबंधितांविरोधात कारवाईचे निर्देश सिटीलिंकने कंत्राटदाराला दिले आहेत.
काही वाहक तिकीट न देता त्याचे पैसे खिशात टाकत असल्याची बाब समोर आल्याने सीसीटीव्हीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. तसेच तिकीट चेकर्सला देखील तिकीट व पैसे यांची तपासणीची सूचना दिली आहे.