

Online fraud of Rs 50 lakhs, scam in the name of task job
सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
सायबर गुन्ह्यांत वाढ होत असताना नाशिक ग्रामीण सायबर पोलिस ठाण्यात आणखी एक मोठा फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे. महेश भीमराव शेरकर (४०, रा. द्वारका नगर, सिन्नर) या व्यक्तीची तब्बल ५० लाख ३३ हजार ६४२ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
फिर्यादी शेरकर यांना आरोपींनी व्हॉट्सअॅप व टेलिग्रामद्वारे टास्क जॉब ऑफर दिली. विश्वास संपादन करून विविध कारणांसाठी वेळोवेळी पैसे मागवले व स्वीकारले. त्यानंतर त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे समोर आले. हा प्रकार १६ जुलै ते ८ सप्टेंबर दरम्यान घडला. संशयित आरोपींनी या आयडी व मोवाइल क्रमांकांच्या माध्यमातून फिर्यादींना टास्क जॉबच्या नावाखाली फसवणुकीच्या जाळ्यात ओढले.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, नाशिक ग्रामीणचे सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
यापूर्वी सिन्नर येथील जयेश माणिकलाल नाईक यांचीही ऑनलाइन पद्धतीने तब्बल ६५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच फसवणुकीची दुसरी घटना घडली आहे.