नाशिक

Nashik Missing Girl Found | सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली चिमुकली आई-वडिलांच्या कुशीत

सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली चिमुकली आई-वडिलांच्या कुशीत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आलेल्या कल्याण येथील कोकणे परिवारातील ११ वर्षीय मुलगी प्रवासादरम्यान आई-वडिलांपासून वेगळी झाली. मात्र सिटीलिंक चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत दाखविलेल्या सतर्कतेमुळे चिमुकली सुखरूपपणे तिच्या परिवाराच्या स्वाधीन झाली. कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

दि. ३१ ऑगस्ट रोजी कोकणे परिवार त्र्यंबकेश्वर येथील दर्शन आटोपून सिटीलिंकच्या मार्ग क्रमांक २४५ वरील बस क्रमांक एमएच-१५ जीव्ही-७६९६ने पंचवटीच्या दिशेने निघाला होता. पंचवटी कारंजा येथे बस थांबल्यानंतर परिवारातील सदस्य खाली उतरले. काही वेळाने ११ वर्षीय जान्हवी सागर कोकणे सोबत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरात शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने परिवाराने पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तत्काळ सिटीलिंक प्रशासनाशी संपर्क साधून बसची माहिती घेतली. संबंधित चालक लोहकरे आणि वाहक अर्चना आंधळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर जान्हवी बसमध्येच असल्याचे स्पष्ट झाले. आई-वडील दिसत नसल्याने ती रडत असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले.

चालक-वाहकांनी तातडीने पर्यवेक्षक चंद्रकांत आव्हाड, किरण सानप, वैभव चौधरी, अमित उगले, गणेश जाधव, अनिल भुसावरे आणि राजेंद्र वाणी यांना माहिती दिली. त्यानंतर मुलीला सुरक्षितपणे सिटीलिकच्या कंट्रोल रूममध्ये आणण्यात आले.

चौकशी कक्ष

आई-वडिलांचा शोध लागेपर्यंत कर्मचाऱ्यांनी तिची आपुलकीने विचारपूस केली. काही वेळातच जान्हवीचे आई-वडील कंट्रोल रूममध्ये पोहोचले. मुलीला सुखरूप पाहताच आईने तिला मिठी मारली. या भावनिक भेटीने उपस्थितांचेही डोळे पाणावले. कोकणे परिवाराने सिटीलिंक कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT