Nashik -शेतातील माती ते 'के. एल. राहुल'च्या कौतुकाची थाप

प्रशिक्षक शरद इंगळेंच्या मुशीत घडतोय नाशिकचा नवा 'स्पीड स्टार' शुभम जाधव
नाशिक : फलंदाज के. एल. राहुलसोबत गोलंदाज शुभम जाधव.
नाशिक : फलंदाज के. एल. राहुलसोबत गोलंदाज शुभम जाधव.
Published on
Updated on

येवला : संतोष घोडेराव

स्वप्न पाहणाऱ्याच्या मनगटात ताकद आणि संघर्षाची तयारी असेल तर परिस्थिती कधीच आडवी येत नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय एका सामान्य शेतकरी कुटुंबातील युवकाने. अंदरसूल या छोट्याशा गावातील शुभम जाधव या शेतकरी पुत्राने हे शब्द प्रत्यक्ष क्रिकेटच्या मैदानात खरे करून दाखवले आहे. अत्यंत बिकट परिस्थिती आणि सुविधांचा अभाव यावर मात करत शुभमने गेल्या ११ वर्षांच्या संघर्षाच्या बळावर नाशिकच्या क्रिकेट जगतात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शुभम या गुणवंत गोलंदाजाने जिद्दीच्या आणि भेदक माऱ्याच्या बळावर थेट भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज के. एल. राहुलला नेटमध्ये बॉलिंग करून गुणवत्ता सिद्ध केली आहे.

अंदरसूलच्या या हिऱ्याला शोधून पैलू पाडण्याचे काम केले ते नाशिकचे मुख्य प्रशिक्षक शरद इंगळे यांनी, नाशिक प्रीमियर लीगमध्ये सलग चार वर्षे आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांची दांडी उडवत बेस्ट बॉलरचा किताब पटकावणारे प्रशिक्षक इंगळे यांच्याकडे शुभम दोन वर्षे सरावासाठी आला. इंगळे यांनी शुभमची नैसर्गिक वेग आणि चेंडूवर असणारी पकड पहिल्याच दिवशी ओळखली. त्याच्या या भेदक गोलंदाजीला मोठे व्यासपीठ मिळावे म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांनी दुसऱ्या क्लबचा खेळाडू आकाश शेलार याच्याशी संपर्क साधून शुभमच्या क्षमतेबद्दल सांगितले. तिथेच या प्रवासाला एक नवे वळण मिळाले. शुभमला थेट मुंबईच्या नामांकित एमआयजी क्लब येथे स्टार फलंदाज के. एल. राहुल याला नेटमध्ये गोलंदाजीची सुवर्णसंधी मिळाली.

शुभमकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचा वेग आणि शिस्त आहे. आगामी आयपीएलच्या मोसमात त्याला नेट बॉलर म्हणून संधी मिळाली तर आयपीएल टीमला आणि पर्यायाने भारतीय क्रिकेटला एक अत्यंत घातक वेगवान गोलंदाज नक्कीच मिळेल.

- प्रशिक्षक शरद इंगळे, नाशिक

'तुझा पेस अप्रतिम आहे'

मुंबईतील एमआयजी क्लबच्या अवघड विकेटवर शुभमने तब्बल ८ षटके टाकून राहुलला गोलंदाजी केली. शुभमचा अचूक टप्पा, वेग आणि बाउन्स पाहून स्वतः के. एल. राहुल थक्क झाला. सराव संपल्यानंतर त्याने शुभमला जवळ बोलावून तुझी गोलंदाजी आणि पेस (वेग) खूप छान आहे. फक्त जास्त शॉर्ट किंवा बाउन्सर चेंडू टाकू नकोस, चेंडू पुढे टप्प्यावर टाकत जा तुला जास्त यश मिळेल, असा मोलाचा सल्ला दिला.

नाशिक डिस्ट्रिक्ट संघात निवड

के. एल. राहुलच्या सल्ल्याचे सोने करत प्रशिक्षक इंगळे यांनी शुभमच्या बॉलिंग लाइन-लेन्थवर दिवस-रात्र मेहनत घेतल्याने शुभमच्या गोलंदाजीत कमालीची सुधारणा झाली. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर आता त्याची नाशिक डिस्ट्रिक्टच्या मुख्य संघात अधिकृत निवड झाली आहे. अंदरसूलच्या मातीत सुरू झालेली ११ वर्षांची ही तपश्चर्या आता खऱ्या अर्थाने रंगू लागली आहे.

माझं स्वप्न भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करण्याचं आहे. शेतकरी कुटुंबातून आलो असलो तरी मेहनतीच्या जोरावर देशासाठी खेळून दाखवेन.

- शुभम जाधव, युवा गोलंदाज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news