electric bus file photo
नाशिक

Nashik Citylink e-buses | कराराअभावी रखडल्या सिटीलिंकच्या ई-बसेस

शासनाकडून कराराचा मसुदा प्राप्त न झाल्याने अडचण

पुढारी वृत्तसेवा

Nashik Citylink e-buses delay

नाशिक : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन वाचविण्यासाठी ई-वाहनांचा वापर करण्याचे आवाहन केले असताना केंद्र व राज्य शासनाकडून कराराचा मसुदा प्राप्त न झाल्यामुळे जेबीएम इको लाइफ या ऑपरेटर कंपनीसमवेतचा महापालिकेचा करार रखडल्याने सिटीलिंकची ५० ई-बसेसची प्रतीक्षा वर्षभरानंतरही कायम आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार महापालिकेने नाशिक महानगर परिवहन महामंडळ कंपनी अर्थात सिटीलिंकची स्थापना करत २०२१ पासून शहर बससेवा चालविण्याचा निर्णय घेतला. सद्यस्थितीत २०० सीएनजी व ५० डिझेल अशा २५० बसेस सिटीलिंकच्या माध्यमातून चालविल्या जात आहेत.

पर्यावरणपूरक बससेवेसाठी केंद्र सरकारच्या 'एन कॅप' योजनेंतर्गत ५० इलेक्ट्रिक बसची खरेदी करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यानंतर केंद्र सरकारने पीएम ई-बस योजनेंतर्गत महापालिकेला १०० ई-बस पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यात पहिल्या टप्प्यात ५० बसेसला मंजुरी मिळाली. नाशिकसाठी जेबीएम इकोलाइफ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ऑपरेटर कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

करारानंतर चार महिन्यांत बसेस

शासनाकडून कराराचा मसुदा प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार महापालिका (सिटीलिंक) आणि ऑपरेटर कंपनीसमवेत करार केला जाईल. करार अंतिम झाल्यानंतर ई-बसेस नाशिकमध्ये आणण्यासाठी चार महिन्यांचा अवधी लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

महापालिकेला ५० बसेस पुरवठा करण्याची जबाबदारी या कंपनीवर असून, त्यासाठी करारनामा अद्याप झालेला नाही. ई-बसडेपोचे काम रखडल्याने सिटीलिंक आणि ऑपरेटर कंपनीतील कराराची प्रक्रिया रखडल्याचे सुरुवातीला सांगण्यात येत होते. आता आडगाव येथील ई-बस डेपोचे काम पूर्ण होऊन दोन महिने उलटले तरी जोबीएम इको लाइफ कंपनीसमवेतचा करार होऊ शकलेला नाही. शासनाकडून कराराचा मसुदा अंतिम होऊ न शकल्याने ई-बसेसचा प्रवास लांबल्याचे बोलले जात आहे.

दुसऱ्या टप्प्यातील ५० ई-बसेसचीही तयारी

पीएम ई-बस योजनेंतर्गत केंद्र सरकारने नाशिक महापालिकेला १०० ई-बसेस देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ५० ई-बसेस मंजूर करण्यात आल्या. आता दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ५० ई-बसेसही मंजूर झाल्या आहेत. आडगाव ट्रक ट्रर्मिनस येथे १०० ई-बसेसच्या पार्किंगची व्यवस्था आहे. मात्र, एकाच ठिकाणी सर्वच ई-बसेस उभ्या करणे संचलनाच्या दृष्टीने योग्य ठरणार नसल्याने महापालिकेकडून पर्यायी जागेचा शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT