सिडको : प्रभाग 29 मधील जनता विद्यालय मतदान केंद्रात पाहणी करताना मुख्य निवडणूक निरीक्षक सचिंद्र प्रतापसिंग. समवेत पवन दत्ता, प्रशांत काळे, सचिन बारी व जग्वेद्रसिंग राजपूत, तर दुसऱ्या छायाचित्रात उत्तमनगरला जनता विद्यालयात मतदान केंद्रासमोर झालेली गर्दी. pudhari photo
नाशिक

Nashik civic election : सिडकोत सहा प्रभागांत पाचनंतर उसळली गर्दी

मतदान शांततेत: बॅरिकेडिंग, ईव्हीएम बिघाड, बोगस मतदानाचा प्रकार

पुढारी वृत्तसेवा

सिडको : महापालिका निवडणूक अंतर्गत सिडको परिसरातील सहा प्रभागांमध्ये मतदान प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली. मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने दुपारनंतर मतदान केंद्रांसमोर गर्दी वाढली, तर सायंकाळी 5 पर्यंत अनेक केंद्रांसमोर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. रायगड चौकातील केंद्रात ईव्हीएम यंत्रांत तांत्रिक बिघाड झाला होता.

सिडकोतील प्रभाग 25, 26 व 28 या प्रभागांमध्ये दुपारी 1.30 पर्यंत 26.9 टक्के मतदान झाले होते. तसेच दुपारी 3.30 पर्यंत प्रभाग क्रमांक 25 मध्ये 37 टक्के, प्रभाग 26 मध्ये 39 टक्के व प्रभाग 28 मध्ये 40 टक्के इतके मतदान झाले होते. तसेच प्रभाग क्रमांक 27 मध्ये 40 टक्के, प्रभाग 29 मध्ये 37 टक्के व प्रभाग 31 मध्ये 43 टक्के इतके मतदान झाले. सिडकोतील प्रभाग 24 मध्ये दुपारी 3.30 पर्यंत 44 टक्के मतदान झाले होते.

जसजशी मतदानाची वेळ संपत आली, तसतशी दुपारनंतर सिडकोतील बहुतांशी मतदान केंद्रांसमोर मतदारांची गर्दी दिसून आली. सिडकोतील प्रभाग 29 मधील जनता विद्यालय हे अतिसंवेदनशील असल्याने 200 मीटर परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच या ठिकाणी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात होता. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जी. बी. एस. पवन दत्ता यांनी सकाळपासून विविध मतदान केंद्रांना भेट देत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

पोलिस प्रशासनाच्या 200 मीटर बॅरिकेडिंगमुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. काठी, व्हीलचेअर अथवा आधार घेऊन आलेल्या मतदारांना 200 मीटर अंतर पायी चालत मतदान केंद्रापर्यंत जावे लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. मोरवाडी तसेच जुने सिडको येथील मॉडेल एज्युकेशन स्कूल शाळेतील मतदान केंद्रात केवळ एकच व्हीलचेअर उपलब्ध असल्याने अडचणी अधिक वाढल्या. मॉडेल एज्युकेशन स्कूलच्या व्हीलचेअरमध्ये बिघाड झाल्याने दिव्यांगांना अडचणी निर्माण झाल्या.

दरम्यान, रायगड चौक येथील महापालिका शाळेतील मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनचे बटण दाबल्यानंतर ते वर न येत असल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. धुळीमुळे तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगत मशीनवर स्प्रे करून त्रुटी दूर केली. त्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली. मात्र, यापूर्वीही अशाच स्वरूपाचे प्रकार घडल्याचा दावा काही मतदारांनी केला.

दरम्यान सिडकोतील मतदान केंद्रांवर 5.30 ला मतदान केंद्रांचे गेट बंद करण्यात आले. परंतु यानंतरही बहुतांश मतदान केंद्रांमध्ये मतदार असल्याने रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते.यावेळी पोलिस उपायुक्त प्रशांत काळे, सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी व अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाने स्पष्ट केले की, सिडकोतील सहा प्रभागांमधील मतदान प्रक्रिया एकूणच शांततेत पार पडली. मुख्य निवडणूक निरीक्षक सचिंद्र प्रताप सिंग, निवडणूक निर्णय अधिकारी पवन दत्ता यांनी मतदान केंद्रांवर भेटी परिस्थितीचा आढावा घेतला.

28 मध्ये बोगस मतदान

प्रभाग क्रमांक 28 मधील हॅपी हॅण्ड स्कूल येथील मतदान केंद्रात बोगस मतदानाचा गंभीर प्रकार उघडकीस आला. कविता पाटील या मतदानासाठी आल्या असता, त्यांच्या नावावर आधीच मतदान झाल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे त्यांनी आपण पहिल्यांदाच मतदान करत असल्याचे सांगितले.

वयोवृद्ध महिलेने बजावला हक्क

84 वर्षीय इंदुमती दराडे यांनी मतदानाचा हक्क बजावत ज्येष्ठ नागरिकांसाठी आदर्श निर्माण केला.

मतदारांना विनंती

मतदान केंद्राच्या गेटसमोरच आपल्यालाच मतदान करावे, यासाठी उमेदवारांकडून हात जोडून मतदान करण्याची विनंती केली जात होती.

जागोजागी वाहतूक कोंडी

मतदानाच्या दिवशी कडेकोट बंदोबस्त, बॅरिकेडिंग व वाहतूक मार्गांतील बदलांमुळे सिडको परिसरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मतदानासाठी आलेले मतदार, स्थानिक नागरिक तसेच वाहनचालकांना बराच वेळ कोंडीत अडकून राहावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT