

नाशिक : महानगरपालिकेसाठी गुरुवारी (दि.15) मतदानावेळी शहरात किरकोळ वाद, गोंधळ वगळता मतदान प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पडली. निवडणुकीपूर्व काळात पक्षांतर्गत गटबाजी, आरोप-प्रत्यारोप तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही उमेदवारांच्या सहभागामुळे ही निवडणूक वादग्रस्त ठरेल, अशी चिन्हे दिसत होती. मात्र, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रभावी नियोजन आणि पोलिस यंत्रणेच्या सतर्कतेमुळे कोणताही मोठा अनुचित प्रकार घडला नाही.
निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याच्या आधीपासून शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ ही विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेमुळे अनेक गुन्हेगारांवर कारवाई होऊन त्यांच्या हालचालींना आळा बसला. निवडणूक जवळ आल्यानंतर लोकशाही प्रक्रियेत सर्वांना समान संधी मिळावी, या उद्देशाने मोहिमेची तीव्रता काही प्रमाणात कमी करण्यात आली असली तरी कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. याच पार्श्वभूमीवर शहरातून 500 हून अधिक गुन्हेगार प्रवृत्तीचे व्यक्ती हे तडीपार करण्यात आले आहेत.
मतदानाच्या दिवशी सकाळी सातपासून नाशिकरोड, सिडको, पंचवटी, म्हसरूळ, रविवार कारंजा, गंगापूर रोड यासह शहरातील संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान केंद्रांच्या परिसरात प्रवेश नियंत्रण ठेवण्यात आले होते. मोबाइल फोन केंद्रामध्ये नेण्यास बंदी असल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या घटना टाळता आल्या. पोलिसांकडून शासकीय वाहनांसह खासगी वाहनांच्या माध्यमातूनही सतत पेट्रोलिंग सुरू होते.
दिवसभरात सिडको व नाशिकरोड भागात एक-दोन ठिकाणी किरकोळ वाद झाले. काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला; मात्र ही परिस्थिती काही मिनिटांतच नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले. नाशिकरोड, जय भवानी रोड व टाकळी परिसरात पैसे वाटपाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. प्रभाग 17 मध्ये माजी नगरसेवक दिनकर आढाव यांच्या फॉर्च्युनर वाहनातून दोन लाख रुपये रोख रक्कम आढळून आल्याने वाहन व रक्कम जप्त करण्यात आली.
या घटनेव्यतिरिक्त दिवसभराच्या मतदान प्रक्रियेत मोठा अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त उशिरापर्यंत हाती आले नव्हते. पोलिस आयुक्त कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, किशोर काळे तसेच सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके, सुधाकर सुरडकर, डॉ. सचिन बारी, संगीता निकम यांच्यासह सुमारे तीन हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी कार्यरत होते.
मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होणार असल्याने या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिसांकडून चोख नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे अवाहन पोलिसांनी केले आहे.
कायदा- सुव्यवस्था राखणे पोलिसांचे कर्तव्यच आहे. मतदान प्रक्रियेची आदर्श अंमलबजावणी करण्यासंदर्भात केलेल्या आवाहनाला उमेदवार व मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. याबद्दल नाशिककरांचा आभार.
संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक