Majhi Ladki Baheen' scheme
'माझी लाडकी बहीण' योजना Pudhari File Photo
नाशिक

Ladki Bahin Yojana | 'सांगा, 'लाडक्या बहिणीं'ची नोंदणी कोठे करावी?

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत नावनोंदणीसाठी महिलावर्ग तहसील, तलाठीसह सेतू कार्यालये, आपले सेवा सरकार केंद्रांमध्ये गर्दी करत आहेत. पण, राज्य स्तरावरून योजनेसंदर्भात नोंदणीची लिंकच उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे मागील चार दिवसांमध्ये एकाही महिलेची नोंदणी योजनेत होऊ शकलेली नाही.

राज्यातील महिलांना आर्थिक हातभार देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली आहे. १ जुलैपासून या योजनेची राज्यभरात अंमलबजावणी सुरू करण्यात आली. योजनेत सहभागासाठी महिलावर्ग तहसील कार्यालयासह सेतू, आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये गर्दी करत आहे. परंतु, याेजनेसंदर्भात शासनाने दिलेली ऑनलाइन लिंकच ओपन होत नाही. त्यातच वारंवार सर्व्हर डाऊनचा मेसेज येत आहे. त्यामुळे केंद्रचालक हैराण झाले आहेत. दरम्यान योजनेत नोंदणीसाठी जिल्हा प्रशासन तसेच योजनेच्या समन्वयकांकडून कोणत्याही सूचना अथवा मार्गदर्शन मिळत नाही. तर दुसरीकडे तासन‌्तास रांगेत उभे राहूनही नोंदणी होत नसल्याने महिलावर्ग थेट केंद्रचालकांशी वाद घालत आहे. त्यामुळे 'सांगा हो, लाडक्या बहिणींची नोंदणी कशी करावी', असा प्रश्न केंद्रचालकांना भेडसावतो आहे.

कुटुंब लागले कामाला

लाडकी बहीण योजनेतील सहभागासाठी शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाच्या दाखल्यासह विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच अन्य कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. त्यामुळे ही कागदपत्रे गोळा करण्यासाठी महिलांसोबतच अवघे कुटुंब कामाला लागले आहे.

'नारीशक्ती'द्वारे नाेंदणी करावी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सहभागासाठी महिलांनी अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र व ग्रामपंचायतींमधून अर्ज करावा. अंगणवाडी सेविकांकडे अर्ज उपलब्ध करून दिले जातील. नारीशक्ती दूत अ‍ॅपवरूनही ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी सुनील दुसाने यांनी दिली.

आपले सरकार केंद्र, सेतूमधून डोमेसाईलकरिता शासकीय शुल्क भरून ऑनलाइन अर्ज केल्यानंतर विहित मुदतीत ऑनलाइनरीत्या प्रमाणपत्र वितरित केले जाते. यासंदर्भात तलाठ्यांना सूचना केल्या आहेत. दाखल्यांसाठी नागरिकांनी दलालांना पैसे देऊ नये.
भीमराज दराडे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन), नाशिक
SCROLL FOR NEXT