लातूर/ नाशिक : ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपण लढत आहोत. आपल्या देशात लोकशाही व्यवस्था असून न्यायव्यवस्थेवर आपला पणे विश्वास आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आपण न्यायालयीन आणि प्रसंगी रस्त्यावरील दोन्ही लढाया देखील लढू, असे ठामपणे सांगत कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील भरत महादेव कराड या तरूणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या नैराश्यातून जीवन संपवले. शुक्रवारी (दि. १२) मंत्री भुजबळ यांनी लातुर येथे कराड कुटुंबियांची त्यांच्या निवासस्थानी जात सांत्वनपर भेट दिली. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंढे, आमदार रमेश कराड, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे, ॲड. सुभाष राऊत, सरपंच विजय गंभीरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी स्व.भरत यांच्या लहानग्या मुलाला पाहून मंत्री छगन भुजबळ यांना गहिवरून आले. त्यांनी या लहानग्या मुलाचे अश्रू पुसत कुटुंबियांना धीर दिला आणि आर्थिक मदत कुटुंबियांना सुपूर्त केली.
भुजबळ म्हणाले की, स्व. भरत कराड यांनी ओबीसींचा ध्यास घेतलेला होता. ओबीसी समाजच आरक्षण कमी होता कामे नये, ही त्यांची भावना होती. ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. गरीब ओबीसींच्या ताटात वाटेकरी नको असे त्याला वाटायचे असे ते म्हणाले. कराड यांची आत्महत्या ही अतिशय दुर्दैवी घटना असून या घटनेने मन सुन्न झाले आहे. त्यामुळे कुणीही असे टोकाचं पाऊल उचलू नका, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांप्रमाणे लढा द्या. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लाऊ देणार नाही, अशी ग्वाहीही भुजबळ यांनी दिली.