

नाशिक : तुम्हाला १० टक्के ईडब्ल्यूएस, राज्य शासनाने दिलेले एसईबीएसचे १० टक्के आरक्षण आणि खुल्या प्रवर्गाचे आरक्षण नको का ? तुम्हाला यापैकी कोणतेही मराठा आरक्षण नको का ? मग हे आरक्षण रद्द करायचे का ? ईडब्ल्यूएस आरक्षणात मराठा समाजाला वाटा ८० ते ९० टक्के इतका आहे. खुल्या प्रवर्गातही ५० टक्के मराठा समाज आहे. हे सगळे आरक्षण सोडून तुम्हाला फक्त ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे आहे का, हे राज्यातील मराठा नेत्यांनी आणि मंत्र्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
शुक्रवारी (दि. १२) लातूरसाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मंत्री भुजबळ म्हणाले की, जे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार शिक्षित आहेत आणि ज्यांना आरक्षण म्हणजे काय हे माहिती आहे, त्यांच्यासाठी मी सांगतो. जेव्हा ५० टक्के आरक्षण आणि ५० ओपन असे होते, तेव्हा ब्राह्मण समाज २ ते ३ टक्के होता. पण तेव्हा मराठा समाज हा ५० टक्के होता. त्यानंतर मग आंदोलले झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत मराठा समाजाला १० टक्के जे आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत, पण सामाजिकदृष्ट्या मागास नाहीत अशांना हे आरक्षण दिले. त्यातही मराठा समाज एकटाच होता. त्यानंतरही वेगळे आरक्षण हवे अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर मराठा समाजाला पुन्हा १० टक्के आरक्षण देण्यात आले. त्यानंतर मराठा समाजाला ओबीसीत घ्या यासाठी आंदोलन होत आहे. यासाठी दबाव टाकला जात आहे, असा आरोपही मंत्री भुजबळ यांनी यावेळी केला.
यावेळी मंत्री भुजबळ यांनी मराठा समाजातील शिक्षित नेते आणि लोकप्रतिनिधींना सवाल केला की, मी मराठा समाजातील शिक्षित, माजी आणि सध्याच्या लोकप्रतिनिधींना एक प्रश्न विचारू इच्छितो, ज्यांना आरक्षण म्हणजे काय हे समजत नाही, अशा अशिक्षित व्यक्तींकडून मला कोणत्याही उत्तराची अपेक्षा नाही, असा टोला त्यांनी मनोज जरांगे-पाटील यांचे नाव न घेता त्यांना लगावला.
तुम्हाला १० टक्के मराठा आरक्षण नको का? ते रद्द करायचे का? ते रद्द केले, तर ईडब्ल्यूएसमध्ये तुम्ही ८० ते ९० टक्के असतात, तेही तुम्हाला नको आहे का? त्यासोबत तुम्ही जे ओपनमध्ये फिरत असता, तेही तुम्हाला नको आहे का याचे उत्तर मराठा समाजातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विषयाचे ज्ञान असलेल्या वर्गाने बोलायला हवे. त्यांनी पुढे येऊन सांगावे अशीही त्यांनी साद घातली.