Chhagan Bhujbal Statement After Manoj Jarange Patil VK Patil Meeting :
ओबीसी नेते तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणासाठी निघालेल्या जीआर आणि त्यानंतरच्या जरांगे आणि विखे पाटील यांच्या झालेल्या भेटीवर भाष्य केलं. त्यांनी राज्यात आरक्षणावरून निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
भुजबळ यांनी राज्यातील आरक्षणाच्या स्थितीवर बोलताना गंभीर दावा केला. राज्य सरकारने जीआर काढल्यानंतर ओबीसी आणि भटक्या समाजात "आमचं आरक्षण संपलं" असा ठाम विश्वास निर्माण झाला आहे. यामुळंच, राज्यात १४ ते १५ आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. या जीआरमुळे भटक्या समाजात मोठा भ्रम निर्माण झाला असून, पुढे काय होईल याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
मराठा नेतृत्वाने पूर्वी सर्वांना सोबत घेऊन काम केल्याची आठवण करून देत भुजबळ यांनी सध्याच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली. "पूर्वी यशवंतराव चव्हाण, शरद पवार, नारायण राणे यांसारखे अनेक मराठा मुख्यमंत्री झाले. त्यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केले. पण आत्ता जे चाललं आहे, ते तुम्ही पाहत आहात," असे ते म्हणाले.
मनोज जरांगे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीवर विचारले असता, भुजबळ म्हणाले की, त्यांनी ही भेट टीव्हीवर पाहिली. विखे पाटील मंत्रिमंडळ किंवा पक्षाचा निरोप घेऊन जरांगे यांना भेटले होते की नाही, याची आपल्याला माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ओबीसी समाजाची भूमिका मांडताना त्यांनी सांगितले की, मागासवर्गीय आणि ओबीसी वर्ग मोठा आहे आणि ते कुठल्या एका जातीसाठी लढत नाहीत. ओबीसी समाजाच्या डीएनए चा संदर्भ देत त्यांनी विधानसभेच्या वेळीच्या राजकारणाची आठवण करून दिली. "सध्या त्यांना (मराठा समाजाला) आरक्षणाची किती आवश्यकता आहे की नाही, हे मला माहीत नाही," असे सूचक विधान करून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सध्याच्या परिस्थितीत ओबीसी समाज हा मोठ्या संकटातून जात असल्याचे मत त्यांनी मांडले.