

मुंबई : आंदोलनात जेवढी डोकी दिसतील तेवढी ताकद सरकारला समजते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षात असला तरी ओबीसी समाजासाठी लढा, आपल्यात एकीचे बळ असले पाहिजे. रात्र वैर्याची आहे, जागे राहा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी येथे केले.
राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषदेतर्फे आझाद मैदानात आयोजित आंदोलनावेळी ते बोलत होते. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटीअर लागू करुन मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी 2 सप्टेंबर 2025 रोजी चुकीचा शासन निर्णय काढला आहे. हा शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या परिषदेच्या आहेत.
परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, चंद्रकांत बावकर, विठ्ठलराव ताकमिडे,राजाराम पाटील, डॉ. वाय. बी. सोनटक्के, उमाकांत शेटे, वैद्यनाथ तोनकरे, अरविंद पाटील रुपेश वनराव आदी उपस्थित होते. भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावरही टीका केली. भुजबळ म्हणाले, आमचा मराठा समाज आरक्षणाला विरोध नाही. पण देत असलेले आरक्षण हे चुकीचे आहे. सरकार या शासन निर्णयातून मराठा समाज व ओबीसी समाजालाही फसवत आहे. हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे असे सांगत कोणीही आत्महत्या करु नये, आपला विजय होणार आहे.
न्यायालयात हा शासन निर्णय टिकणार नाही. राज्यात ओबीसीच्या 374 जाती आहेत. ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आपल्याला आता रस्त्यावर उतरावे लागेल. 2014 नंतर शासनाने दिलेले बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
वाळूचोरांनी मला शिकवू नये
यावेळी जरांगे-पाटील यांचे नाव न घेता भुजबळांनी त्यांच्यावर टीका केली. वाळू चोर, दारु धंदे करणार्यांनी मला शिकवू नये. माझा जन्म मुंबईतच गेला आहे. मी दोनवेळा आमदार, महापौर झालो आहे, असे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी शुक्रवारी नागपूरला होणार्या ओबीसी मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
प्रकाश शेंडगे म्हणाले, हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागेल. आंदोलनाला शिवा संघटनेचे कार्यकर्ते व राज्यभरातून ओबीसी बांधवांचा सहभाग होता.
केलेल्या मागण्या
घटनाबाह्य असलेली माजी न्यायमूर्ती संदिप शिंदे समिती त्वरीत रद्द करा.
नवी मुंबईतील नवीन विमानतळाला भूमिपुत्र कै. दि. बा.पाटील यांचे नाव द्या.
हैद्राबाद गॅझेटीअरमध्ये समाविष्ट लिंगायत जातीसह धनगर, बंजारा,कोळी, धोबी, नाभिक जातीलाही त्या- त्या प्रवर्ग आरक्षण लागू करा.
-अतिवृष्टी झालेल्या जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करून हजार रुपये शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्या
-सर्व शेतकर्यांचे कर्ज माफ करून शेतकर्यांचा 7/12 त्वरित कोरा करा