नाशिक : राष्ट्रवादी भवन येथे क्रेनच्या सहाय्याने ६० फुटी पुष्पहार घालत मंत्री छगन भुजबळ यांचे स्वागत करताना राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे. समवेत पदाधिकारी व कार्यकर्ते. Pudhari News Network
नाशिक

Chhagan Bhujbal | मी नाशिकचा बालक, पालक कोण याची काळजी नको

पालकमंत्र्यांचा निर्णय मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री घेतील

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादविवाद वाढविण्याचे कारण नाही. मी नाशिकचा बालक आहे. पालक कोण होईल त्याची काळजी का करता? बालक तुमच्या सोबत आहे. त्यावर एकवेळ मुख्यमंत्री यांच्याशी बोलेल. पण, आपले कोणतेच काम अडणार नाही. जे कारभारी असतील त्यांना आपण सांगू. गतवेळी देखील दुसरे पालकमंत्री होते. तरी त्यांना कामे सांगितले ती कामे झाली आहे. चांगली कामे व्हावी यासाठी पालकमंत्री असल्याचे कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. पालकमंत्र्यांचा निर्णय मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मंत्री भुजबळ यांनी गुरुवारी (दि. 22) नाशिक येथे राष्ट्रवादी भवन येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. भुजबळ म्हणाले की, 2004 पासून नाशिकच्या विकासासाठी काम करत आलो आहे. त्यामुळे नाशिककरांचे माझ्यावर प्रेम असल्याने त्यांच्याकडून स्वागत झाले. सिंहस्थ कामांवर बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे अद्याप सुरू झाली नाहीत. रिंग रोड केले आहे ती दुरुस्ती करा. नवीन रिंग रोड नको आहे. यात पैसा व वेळ वाया जाईल. त्यापेक्षा आवश्यक असलेल्या गोष्टीकडे लक्ष देऊन कामे झाली पाहिजे. पर्यटनाच्या दृष्टीने दवाखाने व हॉटेल चांगली व्हावी. गोदावरी नदीचे पाणी स्वच्छ करावे. जगभरातील भाविक येथे येतात. त्यामुळे तीर्थ स्वच्छ असावे. तेवढे एक काम झाले तर भरून पावले, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे उपस्थित होते.

वाद वाढविण्याची गरज नाही

पालकमंत्रिपदावरून वाद वाढविण्याची गरज नसल्याचे सांगत भुजबळ यांनी, चांगली कामे व्हावी यासाठी पालकमंत्री असतो. पालकमंत्री असो किंवा नसो चांगली कामे सुचवा, लोकांनी कामे सांगावे ती आपण करू अशी टिप्पणी करत पालकमंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे स्पष्ट केले.

मंत्री भुजबळांचे आतषबाजीने स्वागत

नाशिक : राज्याचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात सदस्याची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी क्रेनच्या सहाय्याने ६० फुटी पुष्पहार घालत, ढोल-ताशांच्या गजरात व भव्य आतषबाजीने शाल- फेटा देत युवक पदाधिकाऱ्यांसह जंगी स्वागत केले.

राजभवनात शपथविधी पार पडल्यानंतर भुजबळ यांच्या नाशिक दौऱ्याने सर्वांचे लक्ष होते. भुजबळ हे आपल्या कर्मभूमीत येत असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांसह समर्थकांना त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा असल्याने भुजबळांच्या स्वागतासाठी समर्थकांसह कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली होती. राष्ट्रवादी भवन येथे भुजबळांचे आगमन होताच युवकचे शहराध्यक्ष खैरे यांनी ६० फुटी पुष्पहार घालत ढोल व फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी भवन येथे भव्य रांगोळी काढण्यात आली होती. दरम्यान, भुजबळांनी नाशिकचा कायापालट केला आहे. त्यांनी केलेल्या विकासाच्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री पद मिळून आगामी कुंभमेळ्यात नाशिकच्या विकासात भर घातली जाणार असल्याचे अंबादास खैरे यांनी सांगितले. यावेळी संदीप गांगुर्डे, शशी हिरवे, व्यंकटेश जाधव, विशाल डोके, संदीप खैरे, हर्षल चव्हाण, संतोष भुजबळ, डॉ. संदीप चव्हाण, नीलेश भंदुरे, नीलेश जाधव, महेश बाळसराफ, भूषण गायकवाड आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT