Guardian Minister | पालकमंत्री ठरेना ! वाद कायम

राज्यात दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद महायुतीत वादाचा विषय
Guardian Minister
पालकमंत्रीPudhari News Network
Published on
Updated on

ठाणे : शशिकांत सावंत

राज्यात मोठे बहुमत घेऊन सत्तेत आलेल्या महायुतीच्या सरकारमध्ये ‘वाद कमी आणि कामे जास्त’ असे सत्तासूत्र ठरले असले तरी रायगड आणि नाशिकमध्ये वादाची किनार कायम आहे. महाराष्ट्रदिनी ध्वजारोहणावरून या वादाच्या ठिणग्या आणखी समोर आल्या. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी रायगडचाच वाद कारणीभूत ठरला होता. हा वाद आता पुन्हा एकदा मागच्या पानावरून पुढे कायम राहिला आहे.

राज्यात दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद महायुतीत वादाचा विषय ठरले आहे. त्यात पहिले नाव आहे रायगड, तर दुसरे आहे नाशिक. या वादाची किनार महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमातही पाहायला मिळाली. शिंदे सेनेच्या आमदारांनी भरत गोगावले यांनाच ध्वजारोहण करण्याचा मान द्या, नाही तर आंदोलन करू, असा इशारा दिला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानपिचक्यांनंतर हे आंदोलन टळले. पालकमंत्रिपदाचा वाद कायम असल्याने जिल्हाधिकार्‍यांनाच ध्वजरोहणाचा मान द्या, अशी मागणी शिंदेंच्या आमदारांनी केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिती तटकरे यांचा ध्वजारोहणाचा मान कायम ठेवल्याने ध्वजारोहण आदिती तटकरे यांच्याच हस्ते झाले.

यानंतर कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी दुधाची तहान ताकावर भागवत महाड येथे ध्वजारोहण केले आणि वाद नसल्याचे सांगत या विषयावर बोलणे टाळले. एकंदरीत 26 जानेवारीनंतर 1 मे रोजीचा मानही आदिती तटकरे यांना मिळाल्याने शिवसेनेत खदखद कायम राहिली. एका बाजूला आदिती तटकरेंच्या महिला बालकल्याण विभागाने शंभर दिवसांच्या मुख्यमंत्र्यांच्या कृती आराखडा मोहिमेच्या परीक्षेत 80 टक्के गुण मिळवून राज्यात नंबर वन मिळवला आहे. तर शिवसेनेचे मंत्री काठावर उत्तीर्ण झाले. त्यामुळे पुन्हा एकदा महिला बालकल्याणचा मान वाढला आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या परीक्षेतही डिस्टिंक्शन मिळवले. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदावर त्यांचा दावा मजबूत झाला आहे.

नाशिक भाजपकडे, रायगड राष्ट्रवादीकडे राहण्याची शक्यता

सध्या वाद टळला याचा अर्थ शिवसेनेने तलवार म्यान केली असा होत नसला तरी त्यांना नमते घ्यावे लागले, हे स्पष्टच आहे. आता वाद असलेले नाशिक भाजपकडे तर रायगड राष्ट्रवादीकडे कायम राहण्याचीच शक्यता आहे. याचे मुख्य कारण कोल्हापूर शिवसेनेकडे गेल्याने रायगडवर राष्ट्रवादीचा दावा अधिक मजबूत झाला आहे; तर 2027 मध्ये होणार्‍या कुंभमेळ्यामुळे भाजपला नाशिक आपल्याकडेच ठेवायचे आहे. सुनील तटकरे यांचा महायुतीतील प्रभाव पाहता रायगड अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडेच राहाणार, हे जवळपास निश्चितच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news