नाशिक : पुढारी वृत्तसेवा
माझ्या खासदारकीबाबत मलाच माहिती नाही. या विषयावर केवळ माध्यमांमध्ये चर्चा सुरू असून, पक्षाकडून कोणतीही अधिकृत विचारणा झालेली नाही, असे स्पष्ट वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.
नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दिल्लीतील संभाव्य खासदारकीच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चावर भाष्य केले. उपमुख्यमंत्री व पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांचा नुकताच खासदारकीचा राजीनामा झाला असून, त्या पश्चिम बंगालमध्ये शपथविधीसाठी गेल्या आहेत. त्यांच्या वेळेनुसार बैठका होतील. मात्र, खासदारकीबाबत माझ्याशी पक्षाने कोणतीही चर्चा केलेली नाही.
मला खासदारकीची इच्छा आहे की, नाही, हेदेखील कोणी विचारलेले नाही. त्यामुळे योग्यवेळी चर्चा होईल तेव्हा सविस्तर बोलू, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये सुरू असलेल्या खासदारकीच्या चर्चावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले की, खासदारकीवर चर्चा तुम्ही माध्यमं करता, आम्ही नाही.
हा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय नसून पक्षांतर्गत निर्णयाचा विषय आहे. पक्षाकडून कोणतीही विचारणा झालेली नसल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. पश्चिम बंगालमधील निवडणुकीवर भाष्य करताना त्यांनी भाजपने मोठ्या प्रमाणात मेहनत घेतल्याचे सांगितले. भाजपला डबल टक्क्यांनी अधिक मतदान मिळाले आहे.
त्यामुळे या विजयावर कोणीही बोट ठेवू नये, असेही ते म्हणाले. निदा खान प्रकरणावर बोलताना त्यांनी संशयित आरोपीला लपवून ठेवणे हा गुन्हा असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू असून, अटकेमागे कोणतेही राजकारण असल्याचे वाटत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. संबंधित पक्षाच्या प्रमुखांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
वारकऱ्यांनी सुज्ञपणे उत्तर द्यावे
वारकरी शाईफेक प्रकरणावरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शाईफेक कुणावरही करू नये. वारकरी संप्रदाय फार मोठा असून, त्यामध्ये विविध विचारांचे लोक आहेत. वारकरी मंडळी सुज्ञ आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यावे, असे त्यांनी म्हटले.
जय पवार यांच्या वक्तव्याचे समर्थन
तामिळनाडूमधील सत्तास्थापनेबाबतचा पेच आता राहिलेला नसल्याचे सांगताना त्यांनी 'प्रत्येकालाच आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटते,' असे मत व्यक्त केले. जय पवार यांनी केलेल्या सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात या वक्तव्यालाही त्यांनी समर्थन दिले.
पीएनजी जोडणीचे आवाहन
पीएनजी गॅसजोडणीबाबतही भुजबळ यांनी नागरिकांना आवाहन केले. ज्या भागांत पीएनजी पाइपलाइन पोहोचली आहे, त्या नागरिकांनी तातडीने पीएनजी कनेक्शन घ्यावे. यासाठी जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ज्यांच्याकडे पीएनजी सुविधा उपलब्ध असेल, त्यांचे एलपीजी कनेक्शन बंद करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.