Goa Illegal Borewell 
नाशिक

Borewell Chemical Water | अंबड मळे परिसरात बोअरवेलमधून येतेय चक्क रसायनयुक्त पाणी! नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

Borewell Chemical Water | मारुती संकुल, तुळजाभवानी मंदिर परिसर, दत्तनगर आणि मळे परिसरातील अनेक बोअरवेलमधून रसायनमिश्रित पाणी येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

सिडको : पुढारी वृत्तसेवा

अंबड औद्योगिक वसाहतीत सांडपाण्यासाठी स्वतंत्र ड्रेनेजलाईन नसल्याने कारखान्यांतील रसायनयुक्त पाणी भूगर्भात झिरपत असून, त्याचा फटका प्रभाग क्रमांक २७ मधील नागरिकांना बसत आहे. मारुती संकुल, तुळजाभवानी मंदिर परिसर, दत्तनगर आणि मळे परिसरातील अनेक बोअरवेलमधून रसायनमिश्रित पाणी येत आहे.

या समस्येवर तातडीने कायस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रभागाचे नगरसेवक नितीन दातीर यांनी दिला आहे.

दातीर यांनी सांगितले की, अनेक उद्योगांनी उभारलेल्या एसटीपी तसेच सांडपाणी साठवण टाक्यांमधून रसायनयुक्त पाणी जमिनीवर झिरपत आहे. काही उद्योगांकडून प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नाल्यांमध्ये सोडले जात असल्याने ते विहिरी व भूजलामध्ये मिसळून पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे आजारांचा धोका वाढला आहे. तसेच शेतीचेही नुकसान झाले आहे.

एमआयडीसी ही स्वतंत्र प्राधिकरण संस्था असून, औद्योगिक वसाहतील रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी तिची आहे. त्यामुळे उद्योगांना पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीने औद्योगिक सांडपाण्याची उचल, प्रक्रिया आणि सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र ड्रेनेज व्यवस्था तातडीने उभारावी, अशी मागणी उद्योजक आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे.

दूषित पाण्याची तातडीने तपासणी करून दोषी उद्योगांवर कठोर कारवाई करावी, प्रभावित नागरिकांना सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि कायमस्वरूपी ड्रेनेज यंत्रणा उभारावी, अशी मागणी नगरसेवक नितीन दातीर यांनी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

"प्रभाग क्रमांक २६ मधील अंबड औद्योगिक वसाहतीतील भाग सोडून चुंचाळेसह परिसर व नवीन वसाहतींसाठी मनपातर्फे ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात आली आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीने ड्रेनेज पाईपलाईन टाकली पाहिजे."
- भागवत आरोटे, नगरसेवक
"एमआयडीसी स्वतंत्र प्राधिकरण संस्था आहे. सांडपाण्याची निचरा व्यवस्था त्यांनी केली पाहिजे. सांडपाणी उचलण्याची जबाबदारी मनपा स्वीकारू शकेल. एमआयडीसी प्राधिकरणाने मनपाला ड्रेनेज डीपीआरसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला पाहिजे."
- सुधाकर बडगुजर, नगरसेवक
"प्रभाग २७ मधील मारुती संकुल, तुळजाभवानी मंदिर परिसर, दत्तनगर आणि मळे परिसरातील अनेक बोअरवेलमधून रसायनमिश्रित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे."
- नितीन दातीर, नगरसेवक
"अंबड औद्योगिक वसाहतीतील एसटीपी इटीपीसाठी राखीव भूखंड ठेवला होता. तोही विकून टाकल्याने ड्रेनेज लाइन झाली नसल्याने रासायनिक पाणी झिरपून जमीन नापीक झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे."
- साहेबराव दातीर, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT