चांदवड : पुढारी वृत्तसेवा
भारतीय सैन्यात असलेला युवा सैनिक सागर रंगनाथ कुंदे (२७) याने सुट्टीवर आलेला असताना राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास खडकजांब येथे घडली.
त्याच्यावर सोमवारी (दि.१६) शासकीय इतमात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. खडकजांब येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेला सागर यास लहानपणापासूनच देशसेवेचे वेड होते.
त्यानुसार त्याने शिक्षण घेत भारतीय सैन्येत भरती झाला होता. १ मार्च रोजी सागर हा घरी सुट्टीवर आलेला होता. त्याने रविवारी (दि. १५) घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याने बेशुद्ध झाला.
त्यास तत्काळ वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती सोमनाथ गोविंद कुंदे (४५) यांनी वडनेर भैरव पोलिसांत दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.