चांदवड : पुढारी वृत्तसेवा
चांदवड शहरातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि. १०) मध्यरात्री ट्रॅव्हल्स बसचा टायर फुटल्याने बस गतिरोधकांवर आदळल्याने या अपघातात २४ प्रवासी जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाला.
राजेंद्र अंबरसिंग सोळुंके (५९, रा. बोराळे, ता. नांदगाव) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव असून, या प्रकरणी बसचालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला. खासगी ट्रॅव्हल्स बस (एमएच १८ बीजी-४००५) अमळनेर येथून पुण्याकडे मुंबई-आग्रा महामागनि सुमारे ४० ते ४२ प्रवाशांना घेऊन निघाली होती.
रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास बस चांदवड शहरातून जात असताना गतिरोधकावर टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस मालेगावकडे जाणाऱ्या मार्गावर उलट्या बाजूला पलटली.
अपघातानंतर झोपेत असलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी स्थानिक नागरिक, पोलिस, सोमा टोल कंपनीचे कर्मचारी व रुग्णवाहिका तत्काळ दाखल झाल्या. जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी पुणे, धुळे, मालेगाव व जळगाव येथे पाठविण्यात आले.
या अपघातात राजेंद्र अंबरसिंग सोळुंके यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी चंद्रकांत गोरख पाटील (रा. नावरी, धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी प्रवाशांची नावे
जयदीप सिसोदिया (४५, चिंचवड, पुणे), पंकज पाटील व देवयानी पाटील (रा. मोशी, आळंदी), अशोक चित्ते (७१) व कल्पना चित्ते (६०, रा. चिंचवड, पुणे), भूषण पाटील (चोपडा, अमळनेर), दत्तात्रय बुरुडे (चरोली बुद्रुक, हवेली), वैष्णवी पाटील, अनिता पाटील, आदित्य पाटील (रा. पुणे), संगीता पाटील (चुंचाळे, चोपडा), दर्शन पाटील (चाकण, पुणे),
तुषार भिल (आरडी, अमळनेर), निंबा पाटील, कैलास पाटील, नितीन कुऱ्हाडे (रा. वणी, धुळे), मेघश्याम डांगल (ब्राह्मणगाव, सटाणा), विजय बिरारी व शोभा बिरारी (रा. रावळगाव, मालेगाव), मिथुन भिल (आरळी, अमळनेर), वंदना चव्हाण (काळवाडी फाटा, पिंपरी-चिंचवड), चंद्रकांत पाटील व जयश्री पाटील (रा. जावरी, नवलनगर, धुळे) आर्दीचा समावेश आहे.