नाशिक रोड : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पावसाळा संपला की, महापालिका, जिल्हा परिषद व इतर निवडणुकींचे वारे सुरू होतील. या सर्व निवडणुका भाजप महायुती म्हणूनच लढविणार असून, सर्वच ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मंत्री बावनकुळे म्हणाले की, आता निवडणूक कोणालाही पुढे ढकलता येणार नाही. पावसाळा संपला की, निवडणुका होतील विधानसभेसारखाच रणसंग्राम महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येईल. या सर्व निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढविणार आहोत. त्याचप्रमाणे मुंबईत आमचे मोठ्या प्रमाणात काम आहे त्यामुळे मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल.
शिवसेना ठाकरे गट व मनसे यांच्यातील युतीबाबत बोलताना राज आणि उध्वव ठाकरे प्रगल्भ नेते आहे योग्य ते निर्णय घेतील. मला त्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगत या विषयाला बगल दिली. तर पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी बोलताना झालेला प्रकार गंभीर असून, अशा घटना घडणे योग्य नाही. आरोपींना कडक शासन होईल तसेच याबाबत सरकारनेसुद्धा गंभीर दखल घेतली असल्याचे बावनकुळे म्हणाले. अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना लवकरच नुकसानभरपाई देण्याबाबत निर्णय होईल. त्याचप्रमाणे बऱ्यापैकी पंचनामे झाले असून, ते उर्वरित पंचनामे लवकरच पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी दिला.
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आगामी निवडणुकीबाबत यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती यावेळी बावनकुळे यांनी दिली.