Nashik School Teachers  
नाशिक

Nashik School Teachers | "सकाळी खडू, दुपारी फॉर्म; 'बीएलओ'च्या दुहेरी कामामुळे नाशिकमध्ये शिक्षकांची पुरती कोंडी!"

Nashik School Teachers | "शिक्षकांच्या 'बीएलओ' ड्युटीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; संतप्त पालकांचा शाळांवर रोष"

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सकाळी हातात खडू आणि दुपारनंतर हातात मतदाराचे फॉर्म, अशा दुहेरी भूमिका जिल्ह्यातील शिक्षक निभावताना दिसत आहेत. प्रशासनाने शिक्षकांवर 'बूथ लेव्हल ऑफिसर' (बीएलओ) ची जबाबदारी सोपवल्याने एकाच वेळी अध्यापन आणि निवडणूक विभागाचे काम करताना शिक्षकांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे जिल्ह्यात २९ जूनपासून सुरू झालेल्या मतदारयादी सखोल पुनरीक्षण पडताळणी मोहिमेमुळे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची पुरती कोंडी झाली आहे.

शैक्षणिक कामकाज आणि निवडणूक कर्तव्य या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ बसावा म्हणून प्रशासनाने सर्व सरकारी, जिल्हा परिषद आणि अनुदानित खाजगी शाळा सकाळी भरवण्याचा निर्णय घेतला. शिक्षकांनी सकाळी शाळा सुटल्यानंतर आणि सुट्टीच्या दिवशी घरोघरी जाऊन बीएलओचे काम पूर्ण करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

परंतु, व्यावहारिक पातळीवर हा निर्णय पूर्णपणे अपयशी ठरताना दिसत आहे. सकाळी घाईघाईत अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि दुपारच्या कडक उन्हात मतदार पडताळणीसाठी दारोदार फिरणे, यामुळे शिक्षकांची ऊर्जा संपुष्टात येत आहे. परिणामी, ना शाळेतील अध्यापन वेळेत पूर्ण होत आहे, ना निवडणूक विभागाचे टारगेट पूर्ण होत आहे.

कारवाईच्या भीतीची टांगती तलवार

शिक्षक संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या शिक्षकांमध्ये प्रचंड भीतीचे आणि दणाणून सोडणारे वातावरण आहे. बीएलओच्या कामात थोडी जरी हयगय किंवा चूक झाली, तर थेट निलंबनाची किंवा विभागीय चौकशीची कारवाई करण्याची धमकी प्रशासनाकडून दिली जात आहे.

या कारवाईच्या भीतीने शिक्षकवर्ग कमालीच्या मानसिक दडपणाखाली वावरत आहे. दुसरीकडे, नवीन वर्षाची सुरुवात असूनही शाळेत नियमित आणि दर्जेदार अध्यापन होत नसल्याने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने, शिक्षकांना आता पालकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे.

ग्रामीण भागात लोक शेतावर, तर शहरात घरांना कुलूप

शिक्षकांना प्रत्यक्ष मैदानावर काम करताना अनेक व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात सध्या पेरणी आणि शेतीचा हंगाम असल्याने बहुतांश नागरिक सकाळी सचीतावर किंवा मजुरीसाठी निघून जातात. घरी केवळ वृद्ध किंवा लहान मुले असतात. ज्यांना मतदारांची पुरेशी माहिती नसते.

शहरांमध्ये जिथे पती-पत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसायानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे दुपारी किंवा संध्याकाळी फ्लॅट्स आणि घरांना कुलूप आढळते. यामुळे एकाच मतदाराची पडताळणी करण्यासाठी शिक्षकांना एकाच घरावर पाच ते सहा वेळा खेपा माराव्या लागत आहेत. ज्यामुळे त्यांचे टारगेट वेळेत पूर्ण करणे अशक्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT