नाशिक : अंजलि राऊत
पितृपक्ष हा पूर्वजांचे स्मरण, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि पितृऋणाची जाणीव करून देणारा काळ मानला जातो. या काळात मृत्यूच्या तिथीनुसार श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करण्याची परंपरा आहे. मात्र, कुटुंबात मुलगा नसल्यास श्राद्ध कोणी करावे, मुलगी आई-वडिलांचे श्राद्ध करू शकते का, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात.
धार्मिक परंपरांमध्ये या विषयावर वेगवेगळ्या भूमिका आढळतात. काही परंपरांमध्ये मुलाला श्राद्धाचा प्रमुख अधिकारी मानले असले, तरी मुलीलाही पितृकार्य करण्याची मान्यता देणाऱ्या धार्मिक व्याख्या आणि प्रथा आजही आहेत.
हिंदू धर्मशास्त्रांमध्ये श्राद्धाचा अधिकार कोणाला असावा, याबाबत विविध नियम आणि अधिकारक्रम सांगितले आहेत. काही परंपरांमध्ये मुलाला प्राधान्य दिले जाते. पुत्र नसल्यास पत्नी, नातू, दौहित्र म्हणजेच मुलीचा मुलगा आणि अन्य पात्र नातेवाईकांना श्राद्धाचा अधिकार देण्यात आला आहे.
धर्मसिंधूसारख्या ग्रंथपरंपरेत श्राद्धविधी आणि त्यासंबंधीच्या अधिकारांचा उल्लेख आढळतो. मात्र, सर्वच धार्मिक परंपरांमध्ये मुलीलाच श्राद्धाचा अधिकार नाही, असे मानले जात नाही. काही धार्मिक व्याख्यांनुसार पुत्र नसल्यास कन्येलाही आई-वडिलांचे श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करता येते.
विवाहित कन्येलाही माहेरच्या पितरांसाठी तर्पण करण्याची मान्यता काही परंपरांमध्ये सांगितली जाते. त्यामुळे श्राद्धाचा अधिकार केवळ मुलापुरता मर्यादित आहे, असे म्हणता येत नाही. पितृकार्य करताना केवळ लिंगाच्या आधारावर निर्णय घेण्याऐवजी संबंधित धार्मिक परंपरा आणि विधींचा विचार करणे महत्त्वाचे ठरते.
सीतेने केलेल्या पिंडदानाचा दाखला:
स्त्रियांनाही पितृकार्य करण्याचा अधिकार असल्याच्या चर्चेत रामायणातील सीतेने राजा दशरथ यांच्यासाठी केलेल्या पिंडदानाचा दाखला दिला जातो. काही धार्मिक लेखांमध्ये या प्रसंगाचा उल्लेख स्त्रीच्या पितृकार्याच्या अधिकाराच्या संदर्भात केला जातो. तसेच गरुडपुराणातील काही व्याख्यांमध्येही स्त्रियांना श्राद्ध करण्याची अनुमती असल्याचे सांगितले जाते. तथापि, या संदर्भाचा अर्थ आणि त्यातून निघणारे निष्कर्ष याबाबत विविध धार्मिक परंपरांमध्ये मतभेद आढळून येतात.
सामाजिक परिस्थिती अन् शास्त्राची मान्यता:
आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत कुटुंबातील मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेद बाजूला ठेवून पितृकार्य करण्याच्या अधिकाराकडे पाहिले जात आहे. अनेक कुटुंबांमध्ये मुली आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ श्राद्ध, तर्पण आणि अन्य धार्मिक विधी करतात. मुलगा नसल्यामुळे पितृकार्य थांबू नये, अशी भूमिका काही आधुनिक धार्मिक अभ्यासकांकडून सांगण्यात येते.
"पितृपक्षातील श्राद्ध हे केवळ धार्मिक विधी नसून पूर्वजांचे स्मरण, त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपापली कौटुंबिक जबाबदारी जपण्याचे माध्यम आहे. मुलगा असो वा मुलगी, श्रद्धेने पितरांचे स्मरण करणे आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत या परंपरेला नवे आयाम प्राप्त होत असून, तिच्यामागील भावनिक आणि सांस्कृतिक मूल्ये जपली जात आहेत."- डॉ. नरेंद्र धारणे, ज्योतिष-धर्मशास्त्र तज्ज्ञ