पणजी : पुढारी वृत्तसेवा
कांदोळी येथील उदय गोल्डस्मिथ ज्वेलर्स या सराफा दुकानातून १६ सोन्याच्या अंगठ्यांची चोरी केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी महाराष्ट्रातील रायगड तालुक्यातील महाड येथील एका हॉटेलातून आंतरराज्यीय टोळीतील दोन महिलांसह पाच जणांना अटक केली. या कारवाईत चोरीस गेलेल्या १६ पैकी १५ सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून, न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पांडुरंग गणपत पवार (वय ७६), मंगेश भाऊ सुर्वे (३५), सतीश नामदेव शिंदे (४१), ज्योत्सना आनंद पवार (६५) हे सर्व रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील खर्नाळेचे रहिवासी असून विमल राजेंद्र जाधव (६१) हा सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे.
२६ जून रोजी ही चोरी उघडकीस आल्यानंतर कळंगुट पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढत पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमधून आरोपींना ताब्यात घेतले.
स्थानिक महाराष्ट्र पोलिसांनीही या कारवाईत सहकार्य केले. संशयितांकडून १५ सोन्याच्या अंगठ्या जप्त केल्या. कळंगुटचे पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ही पाचजणांची टोळी २४ जून रोजी गोव्यात आली होती.
संबंधितांची कसून चौकशी सुरू
ही टोळी २५ जून रोजी मडगाव येथे गेली होती. तेथेही त्यांनी काही ज्वेलरी दुकानांना भेट दिली होती. त्यानंतर २६ जून रोजी दुपारी लोकांची वर्दळ कमी असते अशावेळी उदय गोल्डस्मिथ ज्वेलर्स दुकानात गेली. यावेळी तिघे पुरुष दागिन्यांबाबत दुकानाच्या मालकासोबत बोलत असताना दोघा महिलांपैकी एकीने तेथील अंगठ्याचा एक बॉक्सच काढून पिशवीत टाकला व तेथून त्या दोघी निघून गेल्या होत्या. या टोळीने पणजी व मडगाव येथे चोरी केल्याच्या तक्रारी अजूनही संबंधित पोलिस स्थानकात नोंद झालेल्या नाहीत मात्र त्यांची कसून चौकशी सुरू आहे.