Pune Crime : जिम मालकावर तीन गोळ्या झाडल्‍या; कोयत्यानेही वार! जुन्या वादातून जीवघेणा हल्ला केल्‍याचा संशय

तीन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात, दोन पिस्तूल-सहा गोळ्या आणि कोयता जप्त
Pune Crime
AI Image
Published on
Updated on

पुणे : सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळजाई डोंगर परिसरात बुधवारी रात्री थरारक गोळीबाराची घटना घडली. यामध्ये जिम मालक व ट्रेनर असलेल्या तरुणावर चौघांनी पाठलाग करून तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्यानेही हल्ला करण्यात आला. मात्र गोळ्या लक्ष्यावर न लागल्याने त्याचा जीव वाचला. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह चौघांना ताब्यात घेतले आहे. योगेश बनेकर (वय ३४, रा. धनकवडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आदित्य थोपटे आणि त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश बनेकर यांचा बिबवेवाडी परिसरात जिम व्यवसाय आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी धनकवडी भागात वाहन पार्किंगवरून योगेश आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. त्यावेळी झालेल्या शिवीगाळीचा राग आरोपींच्या मनात होता. त्यातूनच हा हल्ला घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बुधवारी (दि. १०) रात्री योगेश जिम बंद करून घरी निघाले होते. तळजाई डोंगराजवळील बिकानेर चौकात फळे घेण्यासाठी ते थांबले असताना दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. पहिली गोळी त्यांच्या मानेजवळून गेली. गोळीबार होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. योगेश यांनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली.

मात्र आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. पाठलागादरम्यान आरोपींनी आणखी दोन गोळ्या झाडल्या. दोन्ही गोळ्या मात्र चुकल्या. त्यानंतर एका आरोपीने योगेश यांच्यावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांनी जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे काही तासांतच आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

२ पिस्तूल, ६ गोळ्या आणि कोयता जप्त

आरोपींकडे दोन पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे आणि एक कोयता असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यापैकी तीन गोळ्या योगेश बनेकर यांच्यावर झाडण्यात आल्या, तर उर्वरित तीन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही पिस्तुले आरोपींनी कुठून मिळवली, त्यामागे कोणते मोठे रॅकेट आहे का, याचा तपास सहकारनगर पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news