Nashik Cattle Census  file photo
नाशिक

Nashik Cattle Census | ट्रॅक्टरच्या युगात 'सर्जा-राजा' दुर्मीळ; नाशिकच्या शिवारातून 51 हजार बैल गायब!

Nashik Cattle Census | 'सर्जा-राजा' झाला दुर्मीळ ; नाशिकच्या शिवारामधून 51 हजार बैल गायब

पुढारी वृत्तसेवा

बैलपोळा विशेष नाशिक : विकास गामणे
ज्यांच्या गळ्यातील घुंगरांच्या आवाजाने ग्रामीणची सकाळ उजाडायची आणि ज्यांच्या टापांच्या आवाजाने शिवार जागं व्हायचं, तो 'सर्जा-राजा' आता नाशिकच्या शेतातून वेगाने अदृश्य होऊ लागला आहे. नुकत्याच झालेल्या पशुगणनेत नाशिक जिल्ह्यात सध्या सव्वादोन लाख (२,२६,८९९) बैल उरल्याचे समोर आले आहे. यातही धक्कादायक वास्तव हे आहे की, गेल्या अवघ्या पाच वर्षांत तब्बल ५१ हजार बैलांची संख्या घटली आहे.

पोळ्याच्या सणाच्या तोंडावर समोर आलेली ही आकडेवारी नाशिकच्या कृषी संस्कृतीत होत असलेल्या मोठ्या आणि चिंताजनक बदलाची साक्ष देत आहे. पूर्वी शेतातील नांगरणी, कोळपणी, पेरणीपासून ते मालाची वाहतूक करण्यापर्यंत सर्वच कामांसाठी बैलांवर अवलंबून राहावे लागत होते. ग्रामीण भागात एकेकाळी प्रत्येक शेतकऱ्याच्या दावणीला किमान एक बैलजोडी असायची.

बैल हा केवळ शेतात काम करणारा प्राणी नव्हता, तर तो शेतकरी कुटुंबाचा अन्नदाता आणि भावनिक सदस्य होता. मात्र, बदलत्या काळात शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात आले आहे. नांगरणीपासून ते पेरणीपर्यंत सर्व कामांसाठी आता ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि नवनवीन अवजारांचा वापर वाढला आहे.

वाढती महागाई, चारा-पाण्याचे गगनाला भिडलेले भाव आणि वर्षभर बैलांचा सांभाळ करण्यासाठी लागणारा मोठा खर्च यामुळे लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैलजोडी पाळणे परवडणारे राहिलेले नाही.
बैलजोडी विकत घेऊन तिचा वर्षभर सांभाळ करण्यापेक्षा गरजेनुसार ट्रॅक्टर भाड्याने घेऊन काम उरकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी दिवसेंदिवस बैलांची संख्या कमी होत आहे. सन २०१९ मध्ये झालेल्या पशुगणनेत जिल्ह्यात एकूण बैलांची संख्या ही २ लाख ७७ हजार ८९९ इतकी नोंदवली होती. हीच संख्या नुकत्याच झालेल्या पशुगणनेत २ लाख २६ हजार ८९९ इतकी नोंदवली गेली आहे. याचा अर्थ पाच वर्षांत ५१ हजार बैल कमी झाले. ही घटणारी संख्या म्हणजेच हजारो शेतकऱ्यांनी आपल्या दावणीची दोरी कायमची सोडून दिली आहे.

बागायत पट्ट्यात अजूनही सर्जा-राजाची गरज

बैल संख्या ५१ हजारांनी घटली असली, तरी नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा आणि भाजीपाल्याच्या बागायत पट्ट्यात बैलांचे महत्त्व अजूनही टिकून आहे. विशेषतः द्राक्षबागांमधील मशागत, लहान तुकड्यांमधील शेती आणि दुर्गम भागातील कामांसाठी ट्रॅक्टरपेक्षा बैलजोडी जास्त उपयुक्त ठरते. त्यामुळे आजही सव्वादोन लाख बैलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृषी संस्कृतीचा वारसा जपला जात आहे.

संख्या घटूनही पोळ्याचा उत्साह

संख्या घटली असली, तरी बळीराजाच्या मनात आपल्या सर्जा-राजाबद्दल असलेले प्रेम आणि निष्ठा अजिबात कमी झालेली नाही. पोळ्याच्या सणानिमित्त नाशिकच्या ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT