Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Nashik Simhastha Kumbh Mela | नाशिक कुंभमेळ्याचे जागतिक ब्रँडिंग होणार! प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांचे महत्त्वाचे निर्देश

Nashik Simhastha Kumbh Mela | प्रधान सचिव ब्रिजेश सिंह : माध्यम आराखड्यासंदर्भात आढावा बैठक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक ओळख देशासह जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी व्यापक व प्रभावी आराखडा तयार करावा, असे निर्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिले.

महासंचालक सिंह यांच्या उपस्थितीत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या सभागृहात माध्यम आराखड्यासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, महासंचालकांचे विशेष कार्य अधिकारी इरशाद बागवान, वृत्तचित्र विभागाचे वरिष्ठ सहाय्यक संचालक सागरकुमार कांबळे आदी उपस्थित होते.

महासंचालक सिंह म्हणाले, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे १२ वर्षांनंतर होणाऱ्या कुंभमेळ्याचे जागतिक स्तरावर प्रभावी ब्रँडिंग करण्यासाठी पारंपरिक माध्यमांसोबतच डिजिटल माध्यम, समाजमाध्यमे, दृक्-श्राव्य माध्यम आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध माध्यमांचा समन्वयित वापर करावा. त्यासाठी व्यापक आणि सर्वंकष असा आराखडा तयार करावा.

या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याची वैशिष्ट्ये, धार्मिक परंपरा, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, गोदावरी नदी आणि प्रमुख तीर्थस्थळांची माहिती देश-विदेशातील भाविक व पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबवण्यात यावी.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक-त्र्यंबकेश्वरची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण करण्याबरोबरच अध्यात्मिक ठिकाणे, स्थानिक कला, संस्कृती, खाद्यपरंपरा, वारसा स्थळे आणि पर्यटनस्थळांचे प्रभावी सादरीकरण करण्यावरही भर द्यावा.

त्यासाठी विविध माध्यमांसाठी स्वतंत्र आशय निर्मिती, साहित्य आणि सोशल मीडिया मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करावे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यात सुरू असलेल्या दीर्घकालीन विविध पायाभूत सोयीसुविधांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावी. चुकीच्या बाबी, अफवांचे तातडीने खंडन करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. कुंभमेळा आयुक्त सिंह यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली

रामकुंड परिसराला दिली भेट

बैठकीनंतर महासंचालक सिंह यांनी रामकुंड परिसराला भेट देत पाहणी केली. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने भाविकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा, प्रमुख स्थळांचे माध्यमीय सादरीकरण आणि प्रसिद्धीच्या दृष्टीने आवश्यक बाबींची त्यांनी माहिती घेतली.

यावेळी पोलिस आयुक्त कर्णिक, संचालक डॉ. गांगुर्डे, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त रणदिवे, उपसंचालक डॉ. मोघे, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, जिल्हा माहिती अधिकारी बोडके उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT