इंदिरानगर (नाशिक) : परिसरातील केंब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये विविध ठिकाणी तीन बॉम्ब ठेवल्याचा ई- मेल शाळा व्यवस्थापनाला आल्यामुळे सोमवारी (दि. 15) सकाळी 10.30 च्या सुमारास शिक्षक- विद्यार्थ्यांची चांगलीच धावपाळ उडाली. प्रशासनाने तत्काळ पोलिसांना माहिती कळवत विद्यार्थ्यांना बाहेर काढले. तपासाअंती कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत बाहेर पडताना विद्यार्थ्यांचे हाल झाले.
सोमवारी (दि.15) इंदिरानगर परिसरातील केंब्रिज इंग्लिश स्कूल नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता सुरू झाले. प्रार्थना होऊन नियमित वर्ग सुरू झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाला शाळेच्या मेल आयडीवर मध्यरात्री 1.45 च्या सुमारास निनावी मेल आलेला दिसला. त्यात शाळेच्या शौचालयाजवळ तीन बॉम्ब ठेवले असून, लवकरात लवकर विद्यार्थ्यांना बाहेर काढावे असा संदेश त्यात लिहिलेला होता. अचानक मेल निदर्शनास आल्याने घाबरलेल्या व्यवस्थापनाने तत्काळ पोलिसांना याबाबत कळविले. तसेच शाळा रिकामी करण्यासाठी विद्यार्थ्यांची पळापळ सुरू झाली. सकाळच्या वेळेत पूर्व प्राथमिक, प्राथमिकचे सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी व शिक्षक असल्यामुळे बाहेर पडताना सर्वांची एकच धापवळ उडाली. यावेळी अनेक विद्यार्थी चिखलात पडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अनेकांची भीतीने गाळण उडाली होती. सर्वांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांकडून ई- मेल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला असून, सायबर विभागालाही याप्रकरणी माहिती देण्यात आली आहे.
शाळा प्रशासनाने माहिती कळविताच इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या पथकासह बॉम्ब शोधक व नाशक पथकाने शाळेत धाव घेत तसेच परिसर रिकामा करून तपासणी सुरू केली. शाळेतील प्रत्येक वर्गखोली, परिसर, मैदान व संशयास्पद जागांची काटेकोर तपासणी केली. मात्र, कुठेही बॉम्ब किंवा स्फोटक वस्तू आढळली नसल्याने अखेर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.
शाळेकडून अचानक मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी बोलावणे आल्यामुळे पालकांनी घाबरलेल्या अवस्थेत शाळेत धाव घेतली. एकाच वेळी शाळेबाहेर झालेल्या गर्दीत आपली मुले शोधताना पालकांचा गोंधळ उडाला होता. त्यामुळे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रचंड गर्दी झाली होती. या घटनेमुळे शाळा प्रशासन, विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
----
कोट
शाळेच्या मेल आयडीवर शाळेत तीन बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्याचे समजताच तत्काळ पोलिसांना माहिती कळवून विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढून घरी पाठवून देण्यात आले. पोलिस पथकाला आक्षेपार्ह काही वस्तू आढळली नाही.
- प्राचार्य.... (नाव बाकी).
-----