नाशिक : सर्वाधिक 72 जागांवर विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा नाशिक महापालिकेची सत्ता एकहाती काबीज करणाऱ्या भाजपकडेच महापालिकेच्या ‘स्थायी समिती’ रूपी तिजोरीच्या चाव्याही असणार आहेत. महापालिकेतील राजकीय बलाबल लक्षात घेता स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी भाजपकडे दहा, शिवसेना(शिंदे गट) तीन, शिवसेना (उबाठा) दोन, तर राष्ट्रवादी (अजित पवार गटाला) सदस्यपदाची एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
नाशिक महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 122 पैकी 72 नगरसेवक निवडून आलेला भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. भाजपकडे बहुमताच्या 62 आकड्यापेक्षाही दहा नगरसेवक अधिक असल्याने नाशिकचा महापौर भाजपचाच होणार हे स्पष्ट आहे. त्याचबरोबर स्थायी समितीच्या रूपाने महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या देखील भाजपकडेच असणार हेही आता समोर आले आहे. महापौरपद निवडणुकीच्या पहिल्या सभेनंतर स्थायी समिती सदस्यांची निवड घोषित केली जाईल.
स्थायी समितीवर 16 सदस्य नियुक्त करावे लागणार आहेत. महापालिकेतील एकूण 122 सदस्यसंख्या लक्षात घेता स्थायी समितीच्या 16 सदस्यांच्या नियुक्तीसाठी 7.625 चा कोटा आवश्यक ठरणार आहे. त्यानुसार 72 नगरसेवक संख्या असलेल्या भाजपला दहा, 26 नगरसेवक असलेल्या शिवसेनेला 3 जागा मिळतील. 15 नगरसेवकसंख्या असलेल्या उबाठाला दोन, तर 4 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीला उतरत्या क्रमानुसार स्थायी समिती सदस्यपदाची एक जागा मिळू शकते.
काँग्रेसकडे तीनच नगरसेवक असल्यामुळे काँग्रेसला स्थायी समिती सदस्यपदाची संधी मिळू शकणार नाही, असे आकड्यांवरून दिसते. स्थायीच्या 16 सदस्यांपैकी दहा सदस्य हे भाजपचे असणार असल्याने स्थायी समितीच्या सभापती निवडीकरीता बहुमतही भाजपकडेच असणार आहे. त्यामुळे स्थायी समितीचे सभापतिपदही भाजपकडेचे राहणार यात शंका नाही. त्यामुळे महापालिकेची सत्ता राखताना भाजपने स्थायी समितीच्या चाव्याही आपल्याकडे ठेवल्याचे दिसत आहे.