Municipal Council elections : सिन्नर नगर परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना युती File Photo
नाशिक

Municipal Council elections : सिन्नर नगर परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना युती

भाजपचे जिल्हाध्यक्ष बच्छाव, माजी खासदार हेमंत गोडसे यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

BJP-Shiv Sena alliance in Sinnar Municipal Council elections

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी औपचारिक युतीची घोषणा केली आहे. युवा नेते उदय सांगळे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव व माजी खासदार हेमंत गोडसे यांनी युतीची अधिकृत घोषणा केली.

या पत्रकार परिषदेस युवा नेते उदय सांगळे, भाजप शहराध्यक्ष सजन सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील माळी, किशोर देशमुख, दत्ता गोळेसर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक खुळे, तालुकाध्यक्ष योगेश मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष बच्छाव यांनी सांगितले की, प्रदेश पातळीवर वरिष्ठ नेतृत्वाने स्थानिक पातळीवर युतीसंदर्भात निर्णय घेण्याची मुभा दिली आहे. त्या अनुषंगाने सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत युतीबाबत चर्चा झाली का, असा प्रश्न विचारल्यास त्यांनी सांगितले की, राज्यात आम्ही महायुतीत एकत्र असलो तरी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. जागा वाटपाबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. या घोषणेमुळे सिन्नरच्या राजकीय समीकरणात मोठे बदल होताना दिसत असून, नगर परिषदेच्या निवडणुकीत या नव्या युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

युतीमुळे इच्छुकांची संख्या वाढणार : गोडसे

दरम्यान, माजी खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले की, जिल्हा प्रभारी सुहास कांदे व प्रदेश नेतृत्वाशी चर्चा झाल्यानंतर सिन्नरमध्ये शिवसेना-भाजप युतीचा निर्णय घेण्यात आला आहे. या युतीमुळे पक्षातील इच्छुकांची संख्या वाढेल.

भाजप देणार नगराध्यक्षपदाचा उमेदवार

शिवसेना (ठाकरे गट) नगरपालिकेतील माजी गटनेते हेमंत वाजे यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारणा केली असता बच्छाव म्हणाले की, वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजप लढवणार असून, प्रभागनिहाय उमेदवार निश्चितीबाबत सर्वेक्षण सुरू आहे. हेमंत वाजे भाजपमध्ये आल्यास इच्छुकांची संख्या वाढेल, असे बच्छाव यांनी सांगितले. सध्या सात इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

सांगळेंकडून युतीचे स्वागत

युवा नेते उदय सांगळे यांनीही युतीचे स्वागत करताना सांगितले की, ही निवडणूक जोमाने लढवून सिन्नर नगर परिषदेत भाजप-शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्नशील राहू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT